इंडिया आघाडी शरद पवारांचं काहीही बिघडवू शकत नाही; महाराष्ट्रातील बडा नेता काँग्रेसवर तुटून पडला
इंडिया आघाडी शरद पवारांचं काहीही बिघडवू शकत नाही, असं म्हणत महाराष्ट्रातील बड्या नेत्याने काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.

देशात डिलिमिटेशन विधयेकावरून राजकारण तापलं आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारकडून फिल्डिंग लावणे सुरू आहे. सध्या मोदी सरकारला विरोधकांच्या खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवरच जाहीर टीका केली. वडेट्टीवार यांच्या टीकेवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवारांचा पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आधी ते शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा शरद पवार उत्तम होते. राज्यसभेचे तिकीट दिले तेव्हाही उत्तम होते. मात्र मनाविरोधात वागले की टीका नको. सध्या विचार पटला नाही. तर स्वतःचे विचार बदलण्याचा काळ आहे. खंजीर खुपसला असे म्हणण्याची आवश्यकता नाही’.
इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीत मोठा भूकंप घडल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीच्या फुटीवर भाजप नेते, सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. मुनगंटीवार म्हणाले, ‘इंडिया आघाडी पवारांचे काहीही बिघडवू शकत नाही. बिघडायचेच असेल तर इंडिया आघाडीचे बिघडेल’. वाघाच्या नसबंदीच्या मागणीवर ते म्हणाले, ‘वाघाच्या नसबंदीला केंद्र सरकार परवानगी देत नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात वजन आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी उचलला आहे. त्यांनी आपले वजन खर्च करून परवानगी आणावी. या आधी बिबट्याच्या नसबंदीबाबत परवानगी मागितली होती. मात्र केवळ पाच बिबट्यांबाबत परवानगी मिळाली. ती पुरेशी नव्हती’.
राष्ट्रवादीचे खासदार अमर काळेंची वडेट्टीवार यांच्यावर टीका
खासदार अमर काळे म्हणाले, ‘राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्याआधीच विजय वडेट्टीवार यांच्यासारखे मोठ्या नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलंय. ते त्यांना करणे शोभत नाही. एखादा निर्णय चुकल्यास वक्तव्य करू शकता. परंतु पक्षाची भूमिका ठरलेली नसताना असं विधान करणे दुर्दैवी आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडा संयम पाळावा, मौन ठेवावे’.
