दिवाळीच्या सणात सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी! पिठलं-भाकरी खात जाणून घेतल्या अडचणी, अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना

बारामती तालुक्यातील मुर्टी गावात सोनलकर वस्तीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज भेट देऊन शेतकरी बांधवांसोबत पिठलं भाकरी आणि कांदा खात साजरी आज दिवाळी भाऊबिज साजरी केली आहे.

दिवाळीच्या सणात सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी! पिठलं-भाकरी खात जाणून घेतल्या अडचणी, अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना
sunetra pawar
| Updated on: Nov 11, 2026 | 11:34 PM

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या वस्तीवर जाऊन पिठलं भाकरी आणि कांदा खात दिवाळी साजरी केली. बारामती तालुक्यातील मूर्टी आणि आसपासच्या गावांमधील शेतकरी बांधवांची बांधावर शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील पिकांची सद्यस्थिती, पाणीटंचाई आणि दुष्काळाचा शेतीवर झालेला परिणामही जाणून घेतला.

शेतकरी बांधवांशी संवाद साधताना शासनाकडून देण्यात आलेल्या अग्रीम मदतीबाबत सुनेत्रा पवार यांनी विचारपूस केली. तसेच त्यांच्या शेतीविषयक समस्या, अडचणी, मागण्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या काही प्रश्नांवर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली, तर उर्वरित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Loading...

दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या चारा बियाण्यांच्या पाकिटांचे शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांसोबत त्यांच्या शेतावरच पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला. हा केवळ स्नेहभोजनाचा क्षण नव्हता, तर शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना समजून घेण्याचा एक आपुलकीचा संवाद होता असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांवर कोणतेही संकट आले, तरी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकरी बांधवांना दिली.

दुष्काळाच्या संकटात लाडक्या शेतकरी बहिणींशी संवाद!

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी जपणारा. याच भावनेतून आज अंबी बुद्रुक, बारामती येथे शेतकरी बांधव आणि अजितदादांच्या लाडक्या शेतकरी भगिनींची भेट घेतली. त्यांच्या शेतात जाऊन पिकांची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्याशी संवाद साधला.

यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कुठं पिकं वाळून गेली आहेत, तर कुठं पाण्याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतीचा खर्च भागवायचा कसा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर उभे आहेत. विशेषतः शेतकरी भगिनींशी संवाद साधताना त्यांच्या रोजच्या संघर्षाची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव झाल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

अजितदादांनी शेतकरी बांधवांशी आणि भगिनींशी जपलेलं नातं हे विश्वासाचं आणि आपुलकीचं होतं. अजितदादांनी जपलेला जिव्हाळा आणि विश्वास कायम ठेवत त्यांच्या विचारांचा वारसा जपत शेतकरी कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी भाऊबीज असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us