सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड; बड्या नेत्याला दाखवला घरचा रस्ता, थेट राजीनामाच घेतला

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड घडली आहे. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात बड्या नेत्याला घरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाने संबंधित नेत्याचा थेट राजीनामाच घेतला आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड; बड्या नेत्याला दाखवला घरचा रस्ता, थेट राजीनामाच घेतला
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 3:19 PM

पुण्याच्या जुन्नरमधील नेत्याच्या ऑडिओ क्लिप आणि स्टिंग ऑपरेशन प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. जुन्नरच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये लांडे यांनी राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते. यानंतर देवराम लांडे यांनी माफी मागितली होती. आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका समोर आली आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडून भूमिका स्पष्ट 

Loading...

आम्ही कोणत्याही अनुचित प्रकाराचे पक्ष समर्थन करणार नाही, अशी ठाम भूमिका पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी मांडली. याबाबत राजेंद्र कोरेकर यांनी एक पत्रकातून देवराम लांडे प्रकरणावरून भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात कथित ऑडिओ क्लिपमध्ये दहा कोटी रुपयांच्या व्यवहाराची चर्चा आहे. तसेच हवाला पद्धतीने पैसे स्वीकारण्यासंदर्भातील कथित बोलणी आणि स्टिंग ऑपरेशनमधील दोनशे रुपयांच्या नोटेच्या तुकड्यांची देवाणघेवाण समोर आल्याचा दावा केला जातोय.  क्लिपमध्ये माजी आमदार अतुल बेनके, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही उल्लेख आहे. तसेच स्थानिक पत्रकारांना कंपनीच्या बाजूने वळवण्यासंदर्भातील कथित वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झालाय.

देवराम लांडे यांनी दिला राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा 

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर आणि माजी आमदार अतुल बेनके यांनी लांडे यांच्याकडे तातडीने खुलासा मागितला होता. तसेच या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलच्या कथित वक्तव्यावरून देवराम लांडे यांनी मनसे कार्यालयात जाऊन दिलगिरीही व्यक्त केली होती. आता या प्रकरणात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली. आता या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीये.  तसेच पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि पक्षशिस्त अबाधित राहावी, या उद्देशाने देवराम लांडे यांनी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केलाय. लांडे यांच्या राजीनाम्याची जुन्नरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us