तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार… महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर ‘टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला

नवी मुंबईत 'टनटन बाबा' आणि 'लहरी बाबा' म्हणवून घेणाऱ्या दोन भोंदूबाबांनी एका महिलेला संकटाची भीती दाखवून काळी जादू व विधींच्या नावाखाली तब्बल 1.90 लाखांची फसवणूक केली. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 24 तासांत नाशिकमधून अटक केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार... महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला
Crime
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 29, 2026 | 7:26 PM

राज्यात भोंदूबाबा खरातचं प्रकरण गाजत असतानाच आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. नवी मुंबईत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळी जादू आणि अघोरी विधीचा बनाव करत एका महिलेची तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन्ही आरोपींना नाशिकमधून अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या दोन्ही आरोपींनी स्वत:ची ओळख टनटन बाबा आणि लहरी बाबा म्हणून करून दिली होती. आरोपींची मूळ नावे अर्जुन भरत वडसाणे (वय 21) आणि सागर शिवाजी शिंदे उर्फ एकलहरी बाबा (वय 24) अशी आहेत. नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट बाबा बनून काळी जादू व पूजा-विधीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेची एकूण 1 लाख 90 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

आधी भीती घातली, मग…

तक्रारीनुसार, आरोपींनी स्वतःला बाबा म्हणून ओळख करून देत महिलेवर काही संकट येणार असल्याचे सांगितले. तुझ्यावर मोठं संकट येणार आहे. त्यातून तुला बाहेर पडता येणार नाही. केवळ पूजाविधी केल्यावरच तुला बाहेर पडता येईल, असं सांगून या दोन्ही बाबांनी या महिलेला भीती घातली होती. तसेच उपाय म्हणून पूजा आणि विविध विधी करण्याचे सांगत त्यांनी या महिलेकडून रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे उकळले. यात सुमारे 1 लाख 47 हजार रुपये रोख आणि 43 हजार रुपये ऑनलाइनद्वारे असे एकूण 1.90 लाख रुपये घेतले.

अन् सूत्रे फिरली

मा, आपली फसवणूक झाल्याचं या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने नवी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांची सूत्रे फिरली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींचा शोध घेतला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना 12 तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अर्जुन भरत वडसाणे ऊर्फ टनटन बाबा आणि सागर शिवाजी शिंदे ऊर्फ एकलहरी बाबा अशी आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या दोघांनी इतर कुणाची फसवणूक केलीय का? किंवा एखाद्या गुन्ह्यात त्यांचा समावेश आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us