शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात हॉस्टिपटलमध्ये काय चर्चा झाली? सुप्रिया सुळेंनी सगळं सांगितलं
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात हॉस्टिपटलमधील चर्चेवर भाष्य केलं. त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सर्व राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना प्रफुल पटेल यांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला होता. या भेटीत शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात बराच वेळ चर्चा झाली होती. या भेटीच्या व्हिडिओत शरद पवार हे 10 तारखेला भेटुयात, असं पटेल यांना सांगताना दिसत होते. यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदे बोलत होते.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर राज्याचं राजकारण तापलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय चर्चांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीवरही भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली, त्यात गैर काय? आपण इतके असंस्कृत झालो? आता रुग्णालयाचं सोडा… अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचं अनेकदा कौतुक केलं. संसदेतही अनेकदा त्यांची आठवण काढत असते. ते विरोधी पक्षात असताना…ते मोठं नेतृत्व होतं. किती वेळा चिदंबरम यांच्याशी चर्चा झाली असेल. त्यांच्या सोबत कमिटीत काम करणे माझ्यासाठी मोठी बाब असते. ते बोलताना आम्ही अनेक मुद्दे नमूद करत असतो. आम्ही भाषण नमूद करत असतो. त्यांचे लेख वाचणे, आमचा आठवड्याचा अभ्यास असतो’.
आमची वैचारिक लढाई, वैयक्तिक नव्हे – सुप्रिया सुळे
‘पॉलिसी मेकिंगमध्ये कोण कुठल्या पक्षाचं नसतं. विरोधी पक्षात टोकाची भू्मिका घेतो. परंतु पॉलिसी मेकिंगमध्ये…पहलगामचा हल्ला झाला. शरद पवारांनी म्हटलं की, हा देशावर हल्ला आहे. आम्ही सरकारसोबत आहे. ही पहिली लाईन त्यांनी घेतली. त्यानंतर ती लाईन सर्वांनी घेतली. त्यानंतर 100 खासदार 50 देशात गेलो होतो. देशाच्या वतीने गेलो. वैचारिक लढाई आहे. वैयक्तिक लढाई नाही. यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन राजकारण करतो. त्यांच्या विचारानुसार वागलो नाही, तर त्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं सुळे म्हणाल्या.