शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादची ठिणगी, रोहित पवारांच्या मोर्चावर सुप्रिया सुळे नाराज?
मोठी बातमी! रोहित पवारांच्या मोर्चावर सुप्रिया सुळे नाराज? अचानक काय बिघडलं?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. नागपुरात रोहित पवारांनी विधानभवनावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. परंतु या मोर्चावरून खासदार सुप्रिया सुळे नाराज झाल्याचे समोर आलं आहे. पक्षातील वरिष्ठांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रोहित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीत दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नागपूरच्या पत्रकार परिषदेबाबतही वरिष्ठांनाा विश्वास घेतला नसल्याचा आरोप रोहित पवारांवर करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.
रोहित पवार यांनी नागपुरात न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली. रोहित पवार यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मोर्चाची घोषणा केली. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत सलील देशमुख देखील होते. रोहित पवारांनी सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेता रोहित पवारांकडून मोर्चाची घोषणा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासहित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही कुठेही विश्वासात घेण्यात न आल्याची कुजबूज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळे यांनी सलील देशमुख यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रोहित पवारांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.