भगवानबाबाच्या कार्यक्रमात धस- मुंडे एकत्र? आमदार सुरेश धस यांची कार्यक्रमात पोहचताच पहिली प्रतिक्रिया

भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा येतील. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही.

भगवानबाबाच्या कार्यक्रमात धस- मुंडे एकत्र? आमदार सुरेश धस यांची कार्यक्रमात पोहचताच पहिली प्रतिक्रिया
Suresh Dhas
| Updated on: Apr 17, 2025 | 11:06 AM

बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबा गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रम गुरुवारी होत आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी महंत नामदेव शास्त्री पुढाकार घेणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचे विधान केले.

आमदार सुरेश धस काय म्हणाले?

आमदार सुरेश धस म्हणाले की, संत भगवान बाबा नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात होतो. या वर्षी हा मान माझ्या मतदार संघातील गावाला मिळाला. गेल्या सात दिवसांपासून हा उत्सव सुरु आहे. त्यासाठी लाखो लोक राज्यभरातून या ठिकाणी आले आहेत. भगवान बाबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कार्यक्रमात तुमचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे येत असल्याबद्दल आमदार सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा येतील. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही. भगवान बाबा यांच्या पुढे काहीच नाही. येथे नामदेव शास्त्री, भगवान बाबा इतकेच आहे. धनंजय मुंडे आणि आमचे राजकीय युद्ध बाहेर असणार आहे. या ठिकाणी भगवान बाबा यांचा आशीर्वाद घ्यावा, इतकेच आहे.

भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त पिंपळनेरमध्ये कुंभमेळाव्याचे स्वरुप आले आहे. हिंदू मुस्लीम बांधव एकदिलाने भगवान बाबांचा नारळी सप्ताह साजरा करत आहेत. समारंभाच्या सहाव्या दिवशी पिंपळनेर ग्रामस्थांनी तब्बल 15 क्विंटल खव्यापासून गुलाबजाम बनवले. या सप्ताहात मुस्लीम बांधवांचा सहभाग आहे. सप्ताहात मुस्लीम बांधव स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.