अजित पवार यांनी ‘या’ निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, नरेश म्हस्के यांचा मोठा गौप्यस्फोट

ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना नरेश म्हस्के यांनी पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

अजित पवार यांनी या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, नरेश म्हस्के यांचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2023 | 10:22 AM

ठाणे : ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) समर्थक नेते नरेश म्हस्के यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवारांविरोधात अजित पवार यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केलाय. गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या एमसीए निवडणुकीवरून आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.

नरेश म्हस्के यांचा आरोप काय?

अजित पवार यांच्यावर टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले, ‘ पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असं वक्तव्य म्हस्के यांनी केलंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केलाय.

मुख्यमंत्री कोण हे ठरवा..

तर आधी स्वतः च्या पक्षामधे एकमत करा की भावी मुख्यमंत्री उमेदवार कोण आणि मग इतरांवर टीका करा… अजित दादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचादेखील बॅनर लावला गेला , सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहेत का.. असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.

‘गद्दारांना बोलण्याचा अधिकार नाही…’

दरम्यान नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. नरेश मस्के तुम्ही मध्यंतरी काय केलं हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. नरेश मस्केजी तुम्ही शिवसेना या पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला गद्दार म्हणत आहे. नरेश मस्केजी स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा तसेच नरेश मस्केजी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजितदादा बद्दल बोलण्याचा अधिकार नाही.