‘…तर गोळीबार झालाच नसता’, गणपत गायकवाड यांच्या वकिलांचा मोठा दावा

| Updated on: Feb 14, 2024 | 8:24 PM

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांचे वकील निलेश पांडे यांनी आजच्या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला.

...तर गोळीबार झालाच नसता, गणपत गायकवाड यांच्या वकिलांचा मोठा दावा
Follow us on

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांची आज पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात सादर करण्यात आलं. पोलिसांकडून कोर्टात आज त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तर गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी मान्य करु नये, अशी भूमिका मांडली. कोर्टाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाच्या आजच्या सुनावणीनंतर गणपत गायकवाड यांचे वकील निलेश पांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला. “गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांनी संध्याकाळी चार वाजताच पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण त्यांच्या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली गेली नाही. पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गोळीबार झाला नसता”, असा दावा गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी केला आहे.

वकील नेमकं काय म्हणाले?

“कोर्टात युक्तिवाद काय झाला हे सांगण्यापेक्षा आपल्याला ही माहिती देणं महत्त्वाचं ठरेल की, त्यांनी कोर्टात आज सर्व आरोपींना हजर केलं. त्यांनी पोलीस कोठडीसाठी आधी जे कारणं दिलं होतं तेच कारण त्यांनी आजही मांडलं. कोर्टाने सर्व मुद्दे तपासून गणपत गायकवाड यांची पोलीस कोठडी नामंजूर केली. कारण पोलीस कोठडीची काही गरज भासत नव्हती. त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत”, असं गणपत गायकवाड यांचे वकील म्हणाले.

“कट रचला गेला का? हे तपासण्याचं काम तपास यंत्रणेचं आहे. याबाबत आम्ही काही भाष्य करणार नाहीत. पण आपल्या सर्वांना माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय घडलं, कसं घडलं ते सर्वांनी पाहिलं. तिथे किती लोकं होती? मग याला कट म्हणता येतं की, ती मानवी प्रतिक्रिया म्हटली जाते हे सर्वांना माहिती आहे. कट रचण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातात, कसा कट रचला जातो हे सर्वांना माहिती आहे. हे खूप हास्यास्पद आहे की, सिनियर पीआयच्या केबिनमध्ये येऊन एक व्यक्ती गुन्हा करतो. पोलिसांची भूमिका यामध्ये आहे. पोलिसांनी बघायला हवं होतं”, अशी भूमिका गणपत गायकवाड यांचे वकील निलेश पांडे यांनी मांडली.

“या प्रकरणात पहिली एफआयआर घेतली गेली आहे किंवा नोंदवली गेली आहे ही जितेंद्र पारीक आणि वैभव गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे. या गुन्ह्यात जे पीडित दाखवले गेले आहेत त्यांच्यावर ही एफआयआर दाखल केली गेली आहे. गणपत गायकवाड यांच्या जागेवर अतिक्रमण आणि बांधकाम तोडायला जी लोकं गेली त्यांच्याविरोधात चार वाजेपासून तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पण तक्रार नोंदवली गेली नाही. शेवटी रात्री पावणे बारा वाजता गोळीबाराच्या घटनेनंतर तक्रार दाखल केली गेली. ही एफआयआर आधी नोंदवली गेली असती तर बाकी कोणताही गैरप्रकार झाला नसता असं आमचं स्पष्ट मत आहे. बाकी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर येईल”, असंही वकील निलेश पांडे म्हणाले.