
डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर परिसरात होम हवनाच्या वेळी होमकुंडात तूप टाकत असताना एक दुर्देवी घटना घडलेली. एक 33 वर्षीय महिला गंभीररित्या भाजली होती. या महिलेचा दोन आठवड्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे. सरिता निरंजन ढाका असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या दिवशी हा प्रकार घडला होता. सध्या या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 194 नुसार या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोंबिवलीतील टिळकनगर, शिव पॅराडाईज इमारतीत राहणारी सरिता निरंजन ढाका (33) या नवरात्रोत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी आयोजित केलेल्या होम हवन पूजेसाठी बसल्या होत्या. साग्रसंगीत नैवेद्य दाखवण्यापूर्वी होमकुंडात समिधा, शेणगोवऱ्या आणि तूप टाकले जात होते. देवीचा मान म्हणून डोक्यावर ओढणी घेऊन सरिता ढाका होम कुंडात तुपाची धार टाकण्याचा प्रयत्न करत होत्या. याचवेळी, होमकुंडातील धगधगत्या शेणगोवऱ्या आणि तुपाच्या धारेमुळे आगीच्या ज्वाळा अचानक वरच्या दिशेने आल्या. क्षणातच, सरिता यांच्या डोक्यावरील तलम ओढणीने पेट घेतला. ओढणीने पेट घेतल्यामुळे आग सरिता यांच्या संपूर्ण शरीरावर पसरली.
टिळकनगर परिसरात शोककळा पसरली
उपस्थित नागरिकांनी तत्काळ धावपळ करून आग विझवली, पण तोपर्यंत त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांना तात्काळ डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन आठवड्यांपर्यंत मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, सोमवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे टिळकनगर परिसरात शोककळा पसरली आहे. मृत सरिता ढाका या पती निरंजन इंदरलाल ढाका (36) यांच्यासह राहत होत्या. त्यांच्या पतीच्या माहितीनुसार, टिळकनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 194 नुसार या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.