‘चलो अयोध्या’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे स्थानकावर, शेकडो कार्यकर्ते राम जन्मभूमीच्या दिशेला

| Updated on: Apr 07, 2023 | 4:54 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुपारी ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी अयोध्येला जाणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचा ठाणे रेल्वे स्थानकावर निरोप घेतला. यावेळी त्यांनी अयोध्येला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

चलो अयोध्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे स्थानकावर, शेकडो कार्यकर्ते राम जन्मभूमीच्या दिशेला
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येत्या 9 तारखेला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक आज दुपारी ट्रेनने अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: अयोध्येला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ट्रेन अयोध्याच्या दिशेला निघाली. ही ट्रेन दोन दिवसांनी म्हणजे 9 एप्रिलला अयोध्येत दाखल होईल. त्याचदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील आपल्या पक्षाच्या मंत्री आणि आमदारांसह अयोध्येत दाखल होणार आहेत.

एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून अयोध्येत शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आज अयोध्येला ट्रेनने निघाले आहेत. विशेष म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आज ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी बघायला मिळाली. अनेक कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पारंपरिक वादकांच्या आवाजावर थिरकताना दिसली. कार्यकर्ते या दौऱ्यासाठी अतिशय उत्सुक असल्याचं बघायला मिळालं.

विशेष म्हणजे फक्त ठाणे रेल्वे स्थानकच नाही तर नाशिक रेल्वे स्थानकावरदेखील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आलेले बघायला मिळाले. ठाणे पाठोपाठ नाशिक येथूनही एक विशेष ट्रेन अयोध्याच्या दिशेला रवाना झाली आहे. या ट्रेनमधून हजारो कार्यकर्ते प्रवास करताना दिसले.

हे सुद्धा वाचा

‘मी कार्यकर्त्यांना भेटायला स्वत: आलेलो आहे’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी ठाणे आणि नाशिक येथून प्रत्येकी एक-एक ट्रेन निघाली आहे. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त शिवसैनिक आणि रामभक्त या ट्रेनने उद्या अयोध्येत पोहोचतील. प्रभू रामचंद्राचं दर्शन ते परवा घेतील. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश बघायला मिळतोय. मी कार्यकर्त्यांना भेटायला स्वत: आलेलो आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन कधी होतंय, अशा उत्साहात रामभक्त ट्रेनमधून अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे अयोध्या जायचा जेव्हा वेळ येतो तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आपण अयोध्येला जाणार असल्याचं विधान केलंय. त्यांच्या वक्तव्याबद्दल एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारलं असता ते आधी मिश्किलपणे हसले. त्यानंतर म्हणाले, “आमच्यामुळे होईना, अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी ललाईत झाली आहेत. ही चांगली गोष्ट आहे.”