
ठाणे : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि त्यांना 42 आमदारांचे मिळालेले समर्थन यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. बॅनरबाजी, घोषणाबाजी, काळे फासणे आदी प्रकार शिवसैनिकांकडून होत आहेत. तसेच आणखी वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी (Precaution) म्हणून ठाणे जिल्ह्यात (Thane District) 30 जून पर्यंत मनाई आदेश (Restraining Order) लागू करण्यात आले आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे मनाई आदेश लागू केले आहेत.
या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दांडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणताही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांमध्ये प्रचार करणे, व्यक्तीचे प्रेत किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, सभ्यतेला धोका पोहचेल असे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 30 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. (In Thane district the District Collector imposed a restraining order till June 30)