‘…तर मला स्वत:च्या सुरक्षेसाठी संधीच मिळाली नसती’, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

"...तर मला स्वत:ला सावरण्याची आणि सुरक्षेची कोणतीही संधी मिळाली नसती. मग त्या महिलेने आरोप केला असता की जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले", असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.

...तर मला स्वत:च्या सुरक्षेसाठी संधीच मिळाली नसती, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 15, 2022 | 4:21 PM

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महिला विनयभंग गुन्ह्याप्रकरणी ठाणे सेशन कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. ठाणे सेशल कोर्टात आज प्रचंड युक्तीवाद झाला. त्यानंतर आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. जितेंद्र आव्हाड यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात किळवाण्या पद्धतीने प्लॅनिंग करुन अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या वागणुकीवरदेखील प्रश्न उपस्थित केले.

“मला पूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, पूर्ण गर्दीमध्ये एक स्त्री चालत येतेय. मी खासदार श्रीकांत शिंदे यांना बाजूला केलं. त्या बाई समोरुन चालत आल्या. मी बाजूला केलं नसतं तर त्या माझ्या अंगावरच आल्या असत्या. मग मला स्वत:ला सावरण्याची आणि सुरक्षेची कोणतीही संधी मिळाली नसती. मग त्या महिलेने आरोप केला असता की जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले”, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.

“बरं झालं देवाने मला काय बुद्धी दिली. मी त्यांना हलक्या हाताने सांगितलं की, बाजूला व्हा. एवढ्या गर्दीत कशाला जाताय? बाजूला व्हा, हे वाक्य व्हिडीओत ऐकू येतंय”, असं आव्हाड म्हणाले.

“इतक्या घाणेरडा किळसवाणा प्रकार, प्लॅनिंग करायचा, त्याला वरुन आशीर्वाद मिळवायचे. हा कहर आहे. इतकं बदनामीचं षडयंत्र रचनं आणि एखाद्याला राजकीय आणि सामजिक जीवनामधून उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचायचं यामध्ये आनंद कसला?”, असा सवाल त्यानी उपस्थित केला.

“मला परवाही अटक केली. त्यावर कोर्टाने जो निकाल दिलाय, अटक करण्याच्या प्रक्रियेतच तुम्ही चुकी केलीय, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे. हे काय चाललंय?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“पूर्ण घटना व्हिडीओत आहे. गुन्हा दाखल करण्याआधी तो व्हिडीओ तरी पाहायला होता. कलम 354 दाखल करण्यासाठी काही नियम आहेत. पण काही न वाचता डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“पोलीस वरुन खूप दबाव असल्याचं सांगतात. हवलदार पासून डीसीपी, सीपीपर्यंत सर्व वरुन दबाव असल्याचं सांगतात. महाराष्ट्राच असं कधी बघितलं नव्हतं. एखाद्या बाईला पुढे करुन महाभारतासारखं नीच राजकारण केलं गेलं. याच शकुनी कोण ते मला माहीत नाही”, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला.