मीरा भाईंदरमध्ये ‘बांग्लादेश’, महापालिका अधिकाऱ्यांचा अजब कारभार; नागरिकांमध्ये संताप

| Updated on: Jun 18, 2023 | 12:41 PM

मीरा भाईंदर येथील एका वस्तीला बांग्लादेश संबोधलं जात असल्यामुळे महापालिकेनेही या वस्तीचं चक्क बांग्लादेश असं नामकरण केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पालिकेच्या या कारभारावर मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मीरा भाईंदरमध्ये बांग्लादेश, महापालिका अधिकाऱ्यांचा अजब कारभार; नागरिकांमध्ये संताप
Mira Bhaindar Municipal Corporation
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मीरा रोड : येड्यांची जत्रा आणि खुळ्यांचा बाजार, अशी एक मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय कुठे ना कुठे येतच असतो. आता मीरा भाईंदरमध्येही हाच अनुभव आला आहे. मीरा भाईंदरच्या एका भागात विस्थापितांची वस्ती आहे. त्या वस्तीला बांग्लादेशी असं संबोधलं जात होतं. लोक या वस्तीला बांग्लादेशी म्हणत होते. पण आता पालिका अधिकाऱ्यांनी या वस्तीचं अधिकृत नामकरणच बांग्लादेशी असं केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पालिका अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे काय? असा सवालही स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात चक्क बांग्लादेश नावाचा एक परिसर आहे. या ठिकाणी पूर्वी परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक राहत असल्यामुळे या परिसराला बांग्लादेश असे टोपण नाव पडले होते.मात्र आता याच नावाने आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी मालमत्ता देयकावरही याच नावाचा उल्लेख करून या नावाला अधिकृत मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एवढेच नाही तर परिवहन बस थांब्यावरही बांग्लादेश असा उल्लेख करण्यात आला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या अति हुशार आणि कामात प्रामाणिक असणारे अधिकार्‍यांनी या गावाला अधिकृतरित्या बांग्लादेश नाव दिल्याने नव्या वादास सुरुवात झाली आहे. तसेच पालिकेच्या या कृतीवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी?

भाईंदर पश्चिम उत्तन हा समुद्र किनाऱ्या लगतचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी मच्छिमार नागरिकांची गावे अधिक प्रमाणात आहेत. पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आर्थिक संपन्नता आहे. त्यामुळेच या भागात बाजार आणि नवनवीन सुखसुविधाची उभारणी जलद गतीने होत गेली. म्हणून हाताला काही कामधंदा मिळण्याच्या हेतूने अनेक नागरिक या ठिकाणी आले. यात परराज्यातून आलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे. कालांतराने हे लोक उत्तन येथील चौक जवळ असलेल्या मोकळ्या भागात छोटी छोटी घरं करून राहू लागले.

दरम्यान या काळात इंदिरा गांधीच्या पुढाकारामुळे ‘बांग्लादेश’ राज्याची निर्मिती झाली होती. त्यामुळे बांग्लादेश हा शब्द तेव्हा प्रचलित झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी चौक येथील एका छोट्या वस्तीला बांग्लादेश असे टोपण नाव दिले होते. दुर्दैवाने तेव्हा पासून याच नावाची ओळख या परिसराला मिळाली. मात्र आता हे नाव अधिकृतरित्या या परिसराला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

कारण या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डवर बांग्लादेश असा उल्लेख आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून या लोकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता बिलाचे देयकाच्या पत्तामध्ये ‘बांग्लादेश’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नवे तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या बस थांब्यावर देखील बांग्लादेश असाच उल्लेख करण्यात आला आहे.

मनसेने काळे फासले

मूळ भारतीय असताना देखील लोकांच्या उच्चारामध्ये बांग्लादेशी अशी हाक मारली जात असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. बस थांब्याला “बांग्लादेश” असं नाव देणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा मनसेने निषेध नोंदवला आहे. ज्या बस थांब्यावर महापालिकेने बांग्लादेश असा उल्लेख केला आहे, त्या बस थांब्याला मनसे कार्यकर्त्यांनी रात्री काळे फासले आहे. तसेच मनसेने हा फलक तोडून फेकला आहे.