Kalyan Photo : डोंबिवलीनंतर कल्याणात ‘फोटो हटाव’, शिवसेना शाखा आणि कामगार सेनेच्या कार्यालयातून शिंदेचे फोटो काढले

कल्याण पश्चिमेकडील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत लावण्यात आलेले एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे फलक काढून त्या ठिकाणी नव्याने फलक लावलाय. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

Kalyan Photo : डोंबिवलीनंतर कल्याणात फोटो हटाव, शिवसेना शाखा आणि कामगार सेनेच्या कार्यालयातून शिंदेचे फोटो काढले
डोंबिवलीनंतर कल्याणात 'फोटो हटाव'
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 12:54 AM

कल्याण : डोंबिवली शिवसेना शाखेत मुख्यमंत्र्याचे फोटो काढण्यावरून भडकलेला वाद अजून निवळला नाही. तोच कल्याण शिवसेना शाखा आणि पालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोटो (Photo) हटविण्यात आले आहेत. यामुळे नव्या वादा (Dispute)ला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सेनेच्या कार्यालयातून एकनाथ शिंदे यांचा फोटो काढल्याबाबत शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्यात अन्य ठिकाणी फोटो काढण्यावरुन उद्रेक सुरु आहे. आता या ठिकाणी उद्रेक होऊ नये. युनियनच्या कार्यालयात एकनाथ शिंदे यांचा फोटो पुन्हा लावण्यात यावा यासाठी मी आग्रह धरणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरेंचे फोटो लावले

कल्याण पश्चिमेकडील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत लावण्यात आलेले एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे फलक काढून त्या ठिकाणी नव्याने फलक लावलाय. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयातून एकनाथ शिंदे यांचा फोटो काढत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहे. याबाबत युनियनचे संस्थापक अध्यक्ष बाळ हरदास यांनी जेव्हा शिंदे यांना नेते पदावरुन हटविण्यात आले होते, त्याचवेळी त्यांचा फोटो काढला होता. याला बरेच दिवस उलटून गेले आहे. मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.

डोंबिवलीत फोटो काढण्यावरुन दोन गटात राडा

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो काढण्यात आले होते. हे फोटो पुन्हा लावण्यासाठी शाखेत शेकडो शिवसैनिकांनी शिरकाव करत फोटो लावण्यासाठी झटापट केली होती. यामुळे दोन्ही गट भिडले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यविरोधात अपशब्द उच्चारणाऱ्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Photographs of Eknath Shinde were taken from the office of Kalyan Shiv Sena branch and municipal employees Kamgar Sena)