मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, चौकशी होणार? पूर्णेकर हत्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, चौकशी होणार? पूर्णेकर हत्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर
pradip purnekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 12:04 PM

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींची धरपकड केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही ठाकरे गटाकडून आरोप केले जात आहेत. मिनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताच संबंध नसल्याचं कालच स्पष्ट केलं होतं. मात्र, मिनाक्षी शिंदे यांचीही या प्रकरणात चौकशी होणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दुकानदार, आजूबाजूंच्या परिसरातील नागरिक आणि आरोपीच्या नातेवाईकांना गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार आहे. शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनाही कधीही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच अनेक ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्हींचीही पोलीस तपासणी करणार असून गुन्ह्याची उकल करणार आहेत.

Loading...

दुसऱ्या पथकाकडून चौकशी

दरम्यान, पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग पोलिसांनी वाढवला आहे. अटकेत असलेल्या निखिल यादव आणि नितेश पवार यांची आता खंडणी विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. काल रात्री दोन्ही आरोपी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-5च्या ताब्यात होते, प्राथमिक चौकशीनंतर या दोघांना दुसऱ्या पथकाकडे सोपवण्यात आले आहे. या पथकाकडून दोन्ही संशयित आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे.

सूत्रधाराचा शोध घेणार

ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने तपास यंत्रणांना मोठा वेळ मिळाला आहे. हत्येच्या कटाचा सूत्रधार कोण आहे? किती आरोपी नेमके फरार आहेत? तसेच हत्येमागचं कारण काय आहे? याची माहितीही पोलीस घेणार आहेत. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, आरोपींची भूमिका आणि हत्येपूर्वीचा संपूर्ण कट उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त चौकशीतून प्रकरणातील अनेक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यताही आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिनाक्षी शिंदेंकडून इन्कार

दरम्यान, मिनाक्षी शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय दबावामुळेच माझं नाव पुढे आलं आहे. मी केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्याने माझ्यावर आरोप करण्यात आल्याचा दावा करतानाच कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचं मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकलेला व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us