मोठी बातमी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 500 फूट खोल दरीत खासगी कोसळली, 13 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

| Updated on: Apr 15, 2023 | 8:32 AM

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळल्याने 12 ते 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

मोठी बातमी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 500 फूट खोल दरीत खासगी कोसळली, 13 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
private bus accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खोपोली : राज्यातील जनतेसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. ही बस दरीत कोसळल्याने 12 ते 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं आहे. अजूनही काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ पहाटे 4च्या सुमारास ही दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे.

ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने बसमधील प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी गाढ झोपेत होते,

हे सुद्धा वाचा

अचानक बस आदळल्याने या प्रवाशांना जाग आली. अनेक प्रवाशांना बस आदळल्याने मुक्का मार लागला आहे. बस दरीत कोसळताच वाचवा वाचवाचा आक्रोश सुरू झाला. रडारड सुरू झाली. या रडारडीचा आवाज ऐकून आजपासचे ग्रामस्थ दरीच्या दिशेने धावले. त्यानंतर या प्रवाशांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, अंधार असल्याने मदतकार्यात मोठी अडचण येत होती.

बचावकार्य सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक ग्रामस्थ, हायकर्स ग्रुप आणि आयआरबीची टीम पोहोचली. या सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर हाती घेतलं. या अपघातात 12 ते 13 लोक ठार झाल्याचं सांगितलं जातं. बसमध्ये 40 ते 45 लोक होते. त्यापैकी 20 ते 25 लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 16 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या सर्व जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.

गोरेगावमधील पथक

जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना खोपोली नगरपालिकेत पाचारण करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशावर तातडीने उपचार केले जात आहेत. या खासगी बसमधून बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते, अशी माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.