आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
Tribal Students Protest : पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र यातून तोडगा निघालेला नाही.

पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू असून, आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेच्या मागणीसंदर्भात काल स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला, तरी इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. अशातच आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
तोडगा नाही…
आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मात्र, सरकारकडून काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतरही इतर मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
काय म्हणाले मंत्री उईके?
डॉ. अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, आमच्या विद्यार्थ्यांसोबत चांगला संवाद झाला. मला आनंद झाला की आमची मुले अतिशय चांगले बोलायला लागले आहेत. त्यांच्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी आम्ही 2-3 दिवसांचा वेळ दिला आहे. काही गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत, त्यावर आम्ही काम करू. आमची मुलं आहेत, आम्ही त्यांचे आहोत. आमची आणि विद्यार्थ्यांची सविस्तर चर्चा झाली. 14 मुद्यांवर चर्चा झाली आहे. त्यांनी दोन दिवसांची मुदत दिलेली आहे. या काळात ड्राफ्ट बनवून द्यायचा आहे.
ड्राफ्ट मिळाल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ – विद्यार्थी
आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना म्हटले की, आमची ज्याबाबत चर्चा झाली त्यातील काही गोष्टी टेक्निकल आहेत. आम्हाला 12 हजार 500 बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहेत. यासाठी आम्ही 2 दिवसांचा कालावधी दिला आहे. तसेच भरती कशी करणार याचे वेळापत्रक आम्हाला ड्राफ्टच्या मार्फत द्या. हा ड्राफ्ट मिळाल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ. सध्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही.
दरम्यान, गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मंत्री उईके यांच्या भेटीनंतरही मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहेत. यावर तोडगा कधी निघतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.