Tukaram Mundhe : लाडू का कुस्करला? तुकाराम मुंढेंची टेक्निक पाहून भलेभले थक्क; स्वत: सांगितलं काय काय चेक केलं?
तुम्ही एखादा खाद्यपदार्थ हातात घेता तेव्हा तुम्हाला लगेच समजते की त्यात तेलाचे प्रमाण किती आहे. वास घेतला तरी समजतं. मी पण लाडूचा वास घेऊन पाहिला, असे तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 नोव्हेंबर रोजी पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सार्वजनिक दिवाळी फराळ वाटपाचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जाऊन मुंढे यांनी स्वत: लाडू आणि चिवडा तसेच इतर फराळाच्या गुणवत्तेची तपासणी केली. याच कार्यक्रमात त्यांनी हातात लाडू घेऊन तिथेच तो कुस्करला आणि सर्वकाही व्यवस्थित आहे असे सांगितले. दरम्यान मुंढे लाडू कुस्करून नेमकं काय तपासलं, लाडू व्यवस्थित आहे, हे त्यांना नेमकं कसं समजलं, असे विचारले जाऊ लागले. या तपासणीचे नेमके लॉजिकही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
माझ्या हाताला रंग लागला नाही
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी लाडू का कुस्करला, नेमकं काय तपासलं याची माहिती दिली. “लाडू तयार करताना तेल किती वापरलं जातं, तुप किती वापरलं जातं, हे ओळखण्याचे ते तंत्र आहे. मी लाडू दाबला आणि तुम्हाला दाखवला होता. त्यावेळी माझ्या हाताला कोणताही रंग लागलेला नव्हता. म्हणजेच तो लाडू तयार करताना रंग वापरलेला नव्हता. त्याचं प्रमाण नगण्य होतं. सोबतच माझ्या हातांना तेल दिसलं नाही,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सर्व नियमांचे पालन केलेल आहे की नाही…
तसेच, त्या लाडूची आम्ही आधीच लॅबमध्ये टेस्ट केली होती. लॅब रिपोर्टही सगळी बरोबर होते. परंतु तरीदेखील मी हातांनी तपासणी केली. फक्त लॅबच्या चाचणीपुरतेच सर्व नियमांचे पालन केलेले आहे की खरोखरंच सर्व लाडूंसाठी नियमांचे पालन झाले, हे तपासण्याचा माझा उद्देश होता. म्हणून मी लाडू कुस्करला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्या लाडूचे काय करणार?
तुम्ही एखादा खाद्यपदार्थ हातात घेता तेव्हा तुम्हाला लगेच समजते की त्यात तेलाचे प्रमाण किती आहे. वास घेतला तरी समजतं. मी पण लाडूचा वास घेऊन पाहिला, असेही ते म्हणाले. सोबतच या कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या एका सल्ल्याचीही त्यांनी माहिती दिली. डेकोरेशनसाठी लाडू सजवून ठेवण्यात आले होते. त्या लाडूंचेही काय करणार हे मी विचारले. कारण ते लाडू माणसांना खाण्यायोग्य नव्हते. आम्ही ते लाडू गाईंना खायला देणार आहोत, असे त्यांनी मला सांगितले. परंतु ते लाडू उघडे ठेवलेले असल्याने ते खाण्यायोग्य नव्हते. त्यामुळे मी ते कुठेतरी डिस्पोज करावे, असा सल्ला दिला. त्यांनीही तो सल्ला मान्य केला, असं त्यांनी सांगितलं.