
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणी विविध खुलासे होत असताना आता वाल्मिक कराड हाच यामागील सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रातून करण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा दावा केला आहे. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आज विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
महाराष्ट्रात गाड्यांसाठी नवीन नंबर प्लेट काढली गेली आहे. ती मुंबईत 400 रुपयांमध्ये दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 200 रुपयांमध्ये तर गोव्यात 100 रुपये किंमत आहे. मुंबईत सर्वाधिक वाहने आहेत, त्यामुळे जास्त दर का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत दाखल झाले आहेत. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाकरे सेनेच्या नेत्यांना विरोध केला जात आहे.
ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहे. आनंद आश्रम परिसरात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरा समोर आले आहेत. या ठिकाणी येण्यास ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध आहे.
लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. दरम्यान याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली असता छेडछाड प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. तसेच आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ” आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत.” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
दादरमधील शिवाजी पार्कमध्ये मनसेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी संजय राऊतांसोबत मनसे नेते संदीप देशपांडेही उपस्थित होते.संजय राऊतांनी बरीच पुस्तकं चाळून पाहिली. तसेच काही पुस्कते खरेदीही केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. वेतनासह इतर विषयांसाठी देखील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडलं आहे. ठाणे येथील तीन हात नाका परिसरात 60 ते 70 वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनी आहे.
“केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबत छेडछाडीचा प्रकार होत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार” असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गृहमंत्र्यांना केला. “रक्षा खडसे यांची मुलगी आणि माझी भाचीची छेडछाडी करण्याच्या प्रकरणाला दोन दिवस उलटूनही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतेय,” असा आरोप त्यांनी केला.
“अजिबात राजीनामा घेणार नाहीत, या सरकारची गेली ८० दिवस बदनामी होतेय पण या लोकांना काहीही फरक पडत नाही. आम्ही सांगत होतो हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे. खास माणूस एवढा क्रूर की तो व्हिडिओवर बघतोय की मारतात कसे? हे सीआयडी ने सांगितलं ना, आम्ही सांगत होतो त्याला काही अर्थ नव्हता. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, सरकारची एवढी बदनामी होतेय, ८० दिवस सातत्याने महाराष्ट्रात एकच विषय होतोय, या सरकारला धनंजय मुंडे एवढे प्रिय असतील तर काय बोलणार,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत महिला आयोग ठोस भूमिका घेत आहे. स्त्रियांबाबतची समाजातील विकृती वाढत आहे. महिला आयोगाची गरिमा मोठी आहे. महिला आयोगावर कोण काय बोलणार हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं का नाही हे आम्ही ठरवणार,” अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झाले आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त ते अभिवादन करणार आहेत. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिराच्या बाहेर सामूहिक धम्म वंदना होणार आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आज प्रल्हाद ९४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
“माझ्या घरातल्या मुलीसोबत घडलं असं नाही, पण हा सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही. अशा घटनांसंदर्भात मुली समोर येत नाहीत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. या संदर्भात अनेक वेळा सरकारला म्हटलं की तुम्ही या विषयी बांगड्या घातल्या आहेत का? अशा घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळतंय. या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेन,” असं एकनाथ खडसे म्हणाले.
कळव्याच्या प्रारूप विकास आराखड्याच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्थानिक नागरिक एकवटणार आहेत. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ठिकाणी थोड्याच वेळात आंदोलन सुरू होणार आहे.
एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने किंवा अमित शहा यांनी कुठली ट्रेनिंग स्कूल असेल तर त्याला हिंदुत्व संदर्भात ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते गेले त्यांचे भ्रष्ट मंत्राच्या टोळीला किंवा आमदारांना घेऊन आंघोळ घातली कोणता साबण नेला होता मला माहित नाही कोणाकडून साबण घेऊन गेले अमित शहा यांनी कोणता साबण तयार केला आहे वॉशिंग मशीन प्रमाणे, असे राऊत म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याने धनंजय मुंडे यांच्या सह आरोपी केलं नाही यातच मुंडेना शिक्षा झाली असती मात्र राजकीय मित्राला वाचवलं आता खून खंडणी जमिनी बळकविण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय
मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिक मध्ये लागलेले बॅनर चर्चेत आले आहे. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री आशयाचे बॅनर लागले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे.
देशमुख कुटुंबाने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले. जिल्हा कारागृहामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र कारागृह प्रशासनाने संबंधित एजन्सीला दिले आहेत. कारागृहामधील महत्त्वाच्या ठिकाणचे कॅमेरे बंद आहेत बॅटरी बॅकअप वारंवार बंद होत आहे त्यामुळे हे सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे पत्र दिले गेले आहेत
छत्रपती संभाजीनगर महापालिकेला स्वावलंबी करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात येणार आहे. मनपावर असलेले शासनाचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज,विविध योजनांमध्ये भरण्यात येणारा स्वहिस्सा आणि सुरू करण्यात आलेले विविध उपक्रमांची आदी सुरळीत चालण्यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाडमधील चवदार तळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजळा दिला.
जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना… भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलीची छेडछाड… महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
शिदेंनी मोहन भागवतांना विचारावं कुंभमेळ्यात का गेले नाहीत… शिंदे देशातले सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते. किती मंत्री कुंभमेळ्यात गेले ते पाहा… शिंदेंना पुन्हा हिंदुत्वाचे प्रशिक्षण घ्यावं लागेल… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
कल्याण-डोंबिवलीतील गृह फसवणूक थांबवण्यासाठी केडीएमसीने नवा निर्णय घेतला आहे. केडीएमसीने अधिकृत इमारतींची यादी वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. यात २३० अधिकृत इमारतींची संपूर्ण माहिती, नकाशासह महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गृहफसवणुकीला आळा घालण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी नागरिकांना स्वस्त दराच्या आमिषाला न भुलता घर खरेदीपूर्वी आवश्यक पडताळणी करण्याचे आवाहन केले.
ठाणे जिल्हा परिषदेने अभिलेख कक्षातील स्वच्छतेसाठी शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील 300 अधिकारी कर्मचारी ही मोहीम राबवणार आहेत. अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यावेळी निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसाच्या कृती आराखडा या अनुसरून ठाणे जिल्हा परिषद सात कलामी कृती आराखडा प्रभावीपणे राबवण्याचे निश्चित केले आहे.
नाशिक :- स्वातंत्र्य वीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्ते यांचे वकील मनोज पिंगळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ऑनलाइन हजर राहता येणार नाही, प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी गैरहजर राहिल्याने पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. कोर्टात सर्वजण समान असल्याचे न्यायालयाचे मत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्य विरोधात सावरकर प्रेमींनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज याबाबत कोर्टात सुनावणी झाली असताना न्यायालयाने दिले आदेश
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा प्रमुख शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे सर्व नेते येणार आहेत. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दौऱ्याला सुरुवात होणार आहे. एन के टी हॉल येथे सर्व नेत्यांचे विचारमंथन केले जाणार आहे.
खासदार संजय राऊत, विनायक राऊत, सुभाष देसाई, राजन विचारे, भास्कर जाधव हे आणि इतर सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात ठाकरे गटाला लोकसभा आणि विधानसभेत हवे ते यश मिळाले नाही, त्यामुळे या बैठकीतून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना भविष्यातील दिशा दिली जाणार आहे. सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. ठाकरे गटाचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे. ठाण्यातील एन के टी हॉल येथे ही बैठक पार पडणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात हे नेते फिरणार असून त्याची सुरुवातच ठाण्यातून केली जाणार आहे. एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी या दौऱ्याच्या आयोजन ठाण्यातून केले जात आहे,
राज्यभरात काल विविध परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला. यामध्ये जालना जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर पेपरमध्ये कॉपी करताना आढळलेल्या 6 विद्यार्थ्यांना भरारी पथकाने रस्टीकेट केले. मराठी विषयाच्या पेपरला जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकारनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. याची गांभीर्याने दखल घेत कठोर नियोजन करून कालपासून कारवाईला सुरुवात केलीय. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्या भरारी पथकाने अचानक परीक्षा केंद्रावर भेट दिल्यानंतर काही विद्यार्थी कॉपी करताना आढळले यावेळी ही कारवाई करण्यात आली.