मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय घडतंय?

UBT MLA Meet CM Fadnavis : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 3 आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय घडतंय?
UBT MLA Meet CM Fadnavis
Image Credit source: Google
| Updated on: Jul 09, 2026 | 4:47 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे, अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 3 आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरेंच्या 3 आमदारांनी घेतली CM फडणवीसांची भेट

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यभरातील आमदार यानिमित्त मुंबईत आहेत. अनेक नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या 3 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या आमदारांमध्ये अनिल परब , सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. यावेळी या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.

मुंबईतील विकासकामांबाबत भेट

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि आगामी कामांबाबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी काल विधानभवनातील सभागृहात मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली होती. तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती मांडली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीदरम्यान मुंबईतील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाच्या या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदनही दिले. यात मुंबईत पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यासाठी उपाययोजना करण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे.

Follow Us