
Uddhav Thackeray Sppech : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यां शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकच वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी शेतातील जमीनही खरडून गेली आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत अपुरी आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असे असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची मदत या मुद्द्यांवरून टीकाचे आसूड ओढले आहेत. राज्य सरकारने कोंबडीचे झालेले नुसकान आणि या नुकसानीसाठी सरकारने दिलेली मदत यावरून तर ठाकरे चांगलेच संतापले आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज (11 ऑक्टोबर) छत्रपती संभाजी नगरात हंबरडा मोर्चाचे आयोजन केल होते. या मोर्चात माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी सरकारने दिलेल्या मदतीवरून कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पूनर्गठन नको आहे. शेतकऱ्यांचे कर्ज थेट माफ करा. शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत पशूधनाचेही मोठे नुकसान झाले. यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. अनेक कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने कुक्कुटपालक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत देण्यात येत आहे. हाच मुद्दा घेऊन ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. सरकार नाक वर करून म्हणतंय की शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पिकविमा देऊ. पण हा पीकविमा कुठून देणार. कसे देणार. कोंबडी गेली तर एका कोंबडीला १०० रुपये दिले जात आहेत. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव पाहा. मुंबईत दीडशे दोनशेवर हा भाव चालला असेल, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. तसेच एका गायीसाठी ३७ हजार रुपये. ३७ हजारात दूभती गाय मिळते का. एका गायीला १ लााख रुपये लागतात. पैसे आणायचे कुठून? असा थेट सवालही ठाकरेंनी केला.