
महायुतीमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरल्यचं पाहायला मिळालं. भ्रष्टाचाराविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये सरकारचा समाचार घेतला, त्यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले, तुम्ही याविरोधात कोर्टात जाणार का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले ठाकरे?
कोर्टात जायला हरकत नाही. पहिला आमचाच निकाल लागला नाही. तारीख पे तारीख सुरू आहे. तीन वर्ष झाली. काय त्याला कालमर्यादा आहे की नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना बंधन टाकलं आहे, तीन महिन्याच्या आत निकाल लागला पाहिजे. तसं मी सर्वोच्च न्यायालयाला हातजोडून, नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की कृपा करून आपल्या समोर लोकशाहीची जी केस सुरू आहे, तिचीही एक कालमर्यादा ठरवून निकाल द्या. नाही तर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले. किती सरन्यायाधीश झाले पाहिजे? किती दिवसात तो निकाल लागला पाहिजे. असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून, त्यांची माफी मागून, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन, त्यांच्यासमोर उठाबश्या घालून मी त्यांना विनंती करतो, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार निशाणा साधला. जी मतं आपल्या विरोधात आहे त्याची छाटणी करायची आणि मतांची चोरी करून आपली मते वाढवायची. हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. निवडणूक आयोग एक एक निर्णय आपल्या मर्जीने घेत आहे. निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.