मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी ठाकरे गटात खळबळ, 82 पदाधिकाऱ्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी ठाकरे गटात खळबळ, 82 पदाधिकाऱ्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ
Uddhav Thackeray 82 Resign
Image Credit source: Google
| Updated on: May 05, 2026 | 9:19 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

82 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 82 पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हे राजीनामे दिले आहेत. गंगाप्रसाद आनेराव हे शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीला गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता त्यांच्या समर्थनार्थ 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

सदस्यपदाचाही राजीनामा देण्याचा इशारा

गंगाप्रसाद आनेराव यांची खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असताना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे यांनी कारवाई करत आनेराव यांना पदावरून हटवले होते. मात्र आता पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत येत्या आठ दिवसात उद्धव ठाकरेंनी निर्णय मागे नं घेतल्यास आम्ही सदस्य पदाचा देखील राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीला मारली होती दांडी

शिवसेना भवन येथे 25 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये खासदार संजय जाधव आणि त्यांचे काही समर्थक परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. यामध्ये गंगाप्रसाद आनेराव यांचाही समावेश होता. तसेच उपजिल्हाप्रमुख आणि काही तालुकाप्रमुख हे अनुपस्थित असल्याचा समोर आलं होतं. त्यामुळेच गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामुळे आता परभणी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Follow Us