
“सरकारला असं वाटतं की, जो कोणी सरकार, भाजप विरोधी बोलेल तो देशद्रोही. यांना कल्पना नाही, स्वतांत्र्य लढयात यांचा काही संबंध नव्हता. आता दुर्देवाने म्हणा, कशा पद्धतीने निवडून आले हे त्यांना सुद्धा माहिती नाहीय. लोकसभेला 400 पार करायला निघाले होते. पण महाराष्ट्रात उधळलेलं गाढव आपण रोखलं. विधानसभेला काय अशा चाली खेळल्या की अचानक सहा महिन्यात होत्याच नव्हतं झालं. आपल्याला धक्का होता, हे असं कसं झालं” असं उद्धव ठाकरे आझाद मैदान येथील संभेत बोलताना म्हणाले.
“आपलं सरकार येण्याआधी 2017-18 साली नाशिक जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्रातून हजारो-लाखो शेतकरी मुंबईत येत होते. मी ठाण्याच्या वेशीवर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना पाठवलं होतं. त्या शेतकऱ्यांच्या हातात लाल बावटा होता. मला विचारलं तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांच्या हातात लालबावटा. मी म्हटलं, असेल त्याच्या हातात लाल बावटा. पण गोरगरीब शेतकरी अनवाणी चालत येतोय. त्याचे पाय रक्तबंबाळ झालेत. त्याच्या पायातून वाहणारं रक्त सुद्धा लाल आहे, त्याच्याशी माझी बांधिलकी आहे. ही आपली भूमिका होती. तेव्हा त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवण्याच पाप या नीच भाजपच्या लोकांनी केलं होतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्या विरोधात कोण लढणार?
“पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर जनसुरक्षा विधेयक आणताय. तुमचे जे राजकीय विरोधक आहेत, त्यांना तुरुंगात पाठवण्याची स्वप्न बघताय. हे पहलगामचे अतिरेकी गेले कुठे?. जे भाजपत जातील ते साधू-संत. भाजपविरोधी बोलतील ते देशद्रोही असं चित्र आहे. अतिरेकी गेले कुठे? भाजपत गेले का? भाजपत गेले की सगळं माफ? ही सत्तेची मस्ती चालू द्यायची नाही. आणीबाणीच्या काळ्या आठवणी सांगत आहेत, पण 10 वर्ष देशात अघोषित आणीबाणी आहे, त्याचं काय? त्या विरोधात कोण लढणार?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
पण रस्त्यावर आपली सत्ता
“तुम्ही लढणार असाल, तर शिवसेना तुमच्यासोबत आहे. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ते विधेयक आणू इच्छित आहेत. सभागृहात त्यांच्याकडे बहुमत आहे. पण रस्त्यावर आपली सत्ता आहे. काल मोठा दणका सत्ताधाऱ्यांना दिला. हिंदीची सक्ती करत होते, आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण हिंदीची सक्ती माथी मारु देणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जीआरची होळी केली. हे विधेयक आणून तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, तर विरोध केल्याशिवाय राहणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिली.