
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आगामी निवडणुकांचे वारे वेगाने वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते वैभव खेडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला रत्नागिरीत मोठे खिंडार पडले आहे. मनसे नेते वैभव खेडेकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. काल दुपारी ४ वाजता खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यानंतर रात्री खेड येथे मुक्काम करून आज सकाळी सर्व पदाधिकाऱ्यांसह ते मुंबई गाठतील. यानंतर भाजप कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. तसेच, मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे देखील या सोहळ्याला हजर राहण्याची माहिती समोर आली आहे. वैभव खेडेकर यांच्यासोबत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अलीकडेच मनसेने वैभव खेडेकर यांच्यासह तीन जिल्हाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
मुंबईला निघण्यापूर्वी वैभव खेडेकर यांनी काळकाई देवीचे वंदन केले. “माझ्या गेल्या ३० वर्षांची मेहनत आता फळाला येत आहे. माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असे वैभव खेडेकर म्हणाले. यावरुन ते मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपची कोकणातील ताकद वाढणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.