शेतात गेलेले अन् परतलेच नाहीत… गावी दिवाळी साजरी करताना न्यायाधीशांचा असा झाला अंत!
दिवाळी आपल्या माणसांसोबत, कुटुंबासोबत साजरी करता यावी म्हणून अनेक जण गावी जातात. पण कधी काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही, असंच काही एका न्यायाधीशांसोबत झालं आहे, ते शेतात गेले त्यानंतर परतलेच नाहीत... जाणू घ्या कसा झाला त्यांचा अंत...

दिवाळीत सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही एका न्यायाधीशांसोबत झालं आहे, ते शेतात गेले त्यानंतर परतलेच नाहीत. त्यांच्या निधनाचीच बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचली. दिवाळीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. शेतात गेलेल्या न्यायाधीशांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचं निधन झालं असं सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुट्टया घेऊन गावी दिवाळी साजरी करण्यासाठी गेलेले वसई येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तुकाराम ऊर्फ अजित मोटे (43) यांचा विजेच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग गावात घडली आहे.
न्यायाधीश मोटे यांच्या घराजवळच्या शेतात ऊसाच्या फडाला आग लागेली होती. आगीचे कारण शोधण्यासाठी ते शेताकडे गेल होते, त्यावेळी शेतात तुटुन पडलेल्या 11 केव्ही उच्च वीज वाहिनीशी संपर्प झाल्यामुळे त्यांना अतिशय तीव्र विजेचा झटका बसला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनामुळे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यासह संपूर्ण देशिंग गावावर शोककळा पसरली आहे.
तुकाराम मोटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, लहानपणापासून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना केला. पण शिक्षणाची जिद्द असल्याने त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आयुष्याचे चांगले दिवस सुरु झाल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तुकाराम मोटे सध्या पालघर जिल्ह्यातील वसई न्यायालय येथे कार्यरत होते.
दिवाळी साजरी करत असाताना कुटुंबावर मोठं संटक आलं. मुलाच्या अचानक जाण्याने मोटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.