सुप्रिया सुळेंच्या सभेपूर्वी हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांची भेट

बारामती : माढ्याचे खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांनी इंदापूर तालुक्यातल्या बावडा या गावी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्ट केलंय. मोहिते पाटील हे त्यांच्या खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले असताना आपल्या घरी चहासाठी आले. त्यात कोणतीही गुप्त चर्चा झाली …

harshvardhan patil, सुप्रिया सुळेंच्या सभेपूर्वी हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांची भेट

बारामती : माढ्याचे खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांनी इंदापूर तालुक्यातल्या बावडा या गावी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्ट केलंय. मोहिते पाटील हे त्यांच्या खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले असताना आपल्या घरी चहासाठी आले. त्यात कोणतीही गुप्त चर्चा झाली नसून आम्ही आघाडीच्याच उमेदवारांचं काम करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

दरम्यान, सोमवारी सकाळी ही भेट झालेली असतानाच दुपारी इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकारातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आघाडीचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलं.

खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी मात्र मोहिते पाटील यांनी केवळ सदिच्छा भेट दिल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर आपण आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचंच काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम करुनही नंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यातूनच अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालंय. मागील विधानसभा निवडणुकीत आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीने इंदापूर विधानसभा जिंकली. तेव्हापासून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अधिकच नाराजी वाढली. मात्र लोकसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी करण्यात यश मिळवलंय.

मनधरणीमुळे सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल असल्याचं दिसतंय. इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तत्पूर्वीच खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. मात्र ही भेट कोणत्याही चर्चेसाठी नव्हे तर सदिच्छा भेट होती असं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केल्याने या विषयावर सध्या तरी पडदा पडलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *