
बीड: मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील, असेही विनायक मेटे यांनी म्हटले. (Vinayak Mete at Maratha Morcha in beed)
बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चावेळी विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा समाजावर अन्याय होत आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचे भविष्य अंधकारमय झाले आहे. आम्हाला पुढची दिशा सापडत नाही. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाला सरकारच्या भविष्याविषयी विचार करावा लागेल. ही तर सुरुवात आहे. शेवट काय आहे, तो नंतर सांगू, असेही यावेळी विनायक मेटे यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा (Maratha Morcha) निघाला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला आहे. या मोर्चात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र, आम्ही मास्क आणि सॅनिटाय़झर वापरुन शक्य तितक्या नियमांचे पालन करु, असे आश्वासन विनायक मेटे यांनी दिले.
बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कड़ेकोट बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये एसरपीएफच्या एका तुकडीसह 531 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.
मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी 3 डीवायएसपी, 11 पीआय, 28 पीएसआय, 96 महिला पोलिसांसह 306 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय एसरपीएफच्या तुकडीसह जवळपास 600 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच एसरपीएफची एक तुकडीही बीड शहरात तैनात करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Maratha Morcha : कितीही हजारांचा पोलीस बंदोबस्त असू दे, मराठा मोर्चा निघणारच; विनायक मेटेंचा निर्धार
Maratha Morcha: बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार; परवानगी नाकारुनही मोर्चाची जय्यत तयारी
‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’
(Vinayak Mete at Maratha Morcha in beed)