तिला नवऱ्याच्या मित्राची सवय लागली, बापाने गुपचूप केलं असं काही की…लेकीची हाडं नदीतून बाहेर काढण्याची वेळ!
मागील एक ते दीड वर्षापासून मुलीच्या नवऱ्याच्या मित्रासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची माहिती तिच्या पतीने सासरे संतोष गोटे यांना दिली. वडिलांनी मुलीला याबाबत समज ही दिली होती.

Washim Daughter Death : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात बापानेच आपल्या 35 वर्षीय विवाहित मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेली मुलगी विवाहित असूनही तिचे दुसऱ्या मुलासोबत अनैतिक संबंध होते, असा दावा केला जातोय. वारंवार समजूत काढूनही मुलगी ऐकत नसल्यानं रागाच्या भरात मुलीचा बाप संतोष गोटे यांनी आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केली. 20 ऑक्टोबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली.
बापाने खून केल्याची दिली कबुली
विशेष म्हणजे गळा आवळून मुलीचा खून केल्यानंतर आरोपी बापाने दुसऱ्या दिवशी रीतसर अंत्यसंकार उरकले आणि काटेपूर्णा नदीत अस्थी विसर्जनही केलं. पण पोलिसांना याची गुप्त माहिती मिळाली आणि बापाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच बापानं रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली. आता मुलीची आई तक्रार देण्यासाठी पुढे आली असून तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
अनैतिक संबंधाचं प्रकरण काय आहे?
मालेगाव तालुक्यातील एका गावात संतोष गोटे यांच्या मुलीचा 2016 मध्ये हिंगोली जिल्ह्यात विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. दरम्यान मागील एक ते दीड वर्षापासून मुलीच्या नवऱ्याच्या मित्रासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची माहिती तिच्या पतीने सासरे संतोष गोटे यांना दिली. वडिलांनी मुलीला याबाबत समज ही दिली होती. ती मागील काही महिन्यांपासून वडिलांकडे माहेरी राहत होती. दसऱ्याच्या काही दिवस अगोदर ती माहेराहून पळून जाऊन प्रियकराला जाऊन भेटली होती. त्या नंतर वडिलांनी तिला पुन्हा माहेरी ब्राम्हणवाडा इथे आणले. आमची समाजामध्ये बदनामी झाली यावरून तिचा 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या रात्रीच गळा आवळून खून केला.
पोलिसांनी नदीतून हाडं बाहेर काढली
मुलीचा खून केल्यानंतर संबंधित मुलीचा भाऊ, मामा आणि नातेवाईकांना मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलीचा शेतात अंत्यविधी उरकला. लगेच मुलगा आणि मामाने तिचे अस्थिविसर्जन जऊळका परिसरातील काटेपूर्णा नदी मध्ये केले. याची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता त्यांना मृतदेहाचा अंत्यसंस्कार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी यावेळी मृत मुलीचे वडिल संतोष गोटे यांना चोकशीसाठी ताब्यात घेतले. वडिलांनी मुलीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे .याची तक्रार मुलीच्या आईने शिरपूर पोलिसात दिली आहे. मृतक मुलीच्या काटेपूर्णा नदीमध्ये विसर्जित केलेल्या अस्थी पोलिसांनी शोधून काढल्या आहेत. फॉरेन्सिक टीमद्वारे याचे विश्लेषण करण्यात येत असून याचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.