NCP : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत आणि तो यापुढेही सुरू राहील : आ. चिमणराव पाटील

हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नाही की कोणता गट निर्माण करण्यासाठी, पक्ष तयार करण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी. आम्ही अखंड महाराष्ट्र, हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी बंड केले आहे.

NCP : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत आणि तो यापुढेही सुरू राहील : आ. चिमणराव पाटील
आमदार चिमणराव पाटील
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 25, 2022 | 9:10 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकार डगमळीत करत शिवसेनेला खिंडार पाडले आहे. तर शिवसेनेतून बाहेर पडण्यासह बंड करण्याचे कारण हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचेच म्हटले जात आहे. याच्याआधीही निधीच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील चार आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. जे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खोडून काढले होते. मात्र यानंतर जळगावमधील आमदार चिमणराव आबासाहेब पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर शरसंधान केले आहे. तर गेली 30 वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) संघर्ष करत आहोत. आणि तो पुढेही सुरू राहील असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत परंपरागत संघर्ष

शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी थेट शिवसेनेलाच आवाहन दिले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतील अनेक नाराज आमदार जाऊन मिळाले आहेत. ज्यात शिवसेनेतील 35 ते 40 आजी माजी आमदार आहेत. तर काही अपक्ष ही त्यांच्या गटात गेले आहेत. यासर्वांनी आपली नाराजी व्यक्त करताना हे सर्व फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे झाल्याचे म्हटलं आहे. तर याच्याआधी आणि शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे, आ. दिपक केसरकर, आ. संजय शिरसाट, आ. शहाजी बापू पाटील, आ. महेश शिंदे यांनी देखील निधी वाटपाचा आरोप अजित पवार यांच्यावर केला. तर शिवसेना राष्ट्रवादी संपवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिंदे गटातील बंडखोर पारोळा मतदारसंघाचे आ. चिमणराव आबासाहेब पाटील यांनी देखील काँग्रेस – राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, गेली 30 वर्षात आम्हाला आधी काँग्रेसबरोबर आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करावा लागला आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष आहे. आणि तो यापुढेही सुरू राहील.

प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस

तसेच ते म्हणाले, आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत देखिल त्यांच्या विरुद्धच लढाई करावी लागेल. यामुळे आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली होती की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. आणि आमची अडचण त्यांनी सांगितली. तसेच त्यांच्याकडे याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला.

हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र

तर नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्र मधील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. तर हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नाही की कोणता गट निर्माण करण्यासाठी, पक्ष तयार करण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी. आम्ही अखंड महाराष्ट्र, हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी बंड केले आहे. आणि आमच्या या बंडाच्या भूमिकेला दोन तृतीयांश पेक्षा अधिक पक्षाचे आमदार आणि 10 सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.