
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह सर्वत महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली आहे. या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे विलिनीकरण होऊ शकले नव्हते. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. भूजबळ नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
नाशिकच्या येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु अशा काही चर्चा झाल्या का याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत. जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे आहे. असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपच्या काही ज्येष्ठ मंडळींना विचारावं लागेल. कारण काय बोलणं झालं होतं हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाही.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ज्यांच्या सोबत यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. जर सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली. आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही. राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची शपथ घेत एकत्रिकरणाची चर्चा झाली होती अशी माहिती दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, बोलणं झालं असेल, परंतु आता परिस्थिती बदलली, नेते बदलले आहेत. सुनेत्रा ताईंना माहिती होती का ? आता त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील. शेवटी हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे.