Inside Story | समीर वानखेडे का अडकले? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: May 17, 2023 | 11:51 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळं प्रसिद्धीस आलेले अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आर्यन खान प्रकरणात सीबीआयनं वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Inside Story | समीर वानखेडे का अडकले? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासह इतर 5 जणांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. ज्यांच्या नेतृत्वात छापा पडला त्या समीर वानखेडेंविरोधात ज्या के. पी. गोसावीनं शाहरुखच्या मुलाला पकडून आणलं त्याच्या विरोधात ज्या सॅम्युअल डिसूझानं ड्रग्ज पार्टीची टीप दिली त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल झालाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागण्यात आली. आरोपी किरण गोसावी यानं शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडे पैशाची मागणी केली. 25 कोटींऐवजी हा सौदा 18 कोटींमध्ये फिक्स झाला. पण या दोघांमधलं फोनवरचं संभाषण रेकॉर्ड झालं. या संभाषणात किरण गोसावी यानं समीर वानखेडेंचंही नाव घेतलं. समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये द्यायचे आहेत असं गोसावीनं पूजा ददलानीला सांगितलं. आर्यन खान केसमधला एक साक्षीदार प्रभाकर साईलनंही ही गोष्ट माध्यमांसमोर येत सांगितली होती.

पैशांचं डिल फिसकटल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली. पण एनसीबीनं आर्यन खानची ब्लड टेस्टच केली नाही. आर्यन खानकडे एनसीबीला कुठलेही ड्रग्ज सापडले नाहीत. तरीही त्याला 20 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं. आर्यनच्या सुटकेनंतर हे प्रकरण थंडावलं असं वाटलं. पण दीड वर्षानंतर या प्रकरणात अचानक सीबीआयची एन्ट्री झाली. यामागचं कारणही इंटरेस्टिंग आहे.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खान दिल्लीत बड्या नेत्याला भेटला?

काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, मुंबईतल्या एका मोठ्या सुपरस्टारनं शाहरुख खानची भेट घेतली. त्या सुपरस्टारनं कायदेशीर लढाई लढण्याची गळ शाहरुख खानला घातली. शाहरुख खानही त्यासाठी तयार झाला. त्यानंतर शाहरुख खान आणि तो सुपरस्टार एका चार्टर्ड विमानानं दिल्लीला गेले. दिल्लीत त्या दोघांनी एका अशा नेत्याची भेट घेतली की ज्या नेत्याचा आदेश कुठलीही सरकारी यंत्रणा मोडू शकत नाही. त्या भेटीत शाहरुख खाननं ऑडिओ क्लिपचा पुरावा त्या नेत्यासमोर ठेवला आणि त्या नेत्याच्या आदेशानंतर सीबीआयनं तपासाची चक्रे वेगानं फिरवली.

बड्या अधिकाऱ्याशी पंगा भोवला?

आर्यन खान प्रकरणात वानखेडेंचा पाय खोलात जाण्यामागे आणखीही एक कारण असल्याचं बोललं जातंय. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि इतरांच्या तपासकार्याची चौकशी केली होती. आपल्या अहवालात त्यांनी वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकाऱ्यांवर नियमांचे पालन न केल्याचा आरोप केला होता. पण समीर वानखेडे यांनी ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधातच केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची तक्रार वानखेडेंनी केली होती. त्यामुळं ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी पंगा घेणं समीर वानखेडेंनी नडलं असंही बोललं जातंय.

छुपी राजकीय महत्वकांक्षा?

सूत्रांच्या माहितीनुसार, समीर वानखेडे अडचणीत येण्यामागचं आणखीही एक कारण आहे, ते म्हणजे त्यांची छुपी राजकीय महत्वकांक्षा. आर्यन खान प्रकरणात नावारुपाला आल्यानंतर समीर वानखेडेंच्या राजकीय महत्वकांक्षा जाग्या झाल्या होत्या. वानखेडेंच्या आपल्या मूळ गावाकडे फेऱ्या वाढल्या होत्या. वाशिममधल्या मूळ गावी ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडेही त्यांच्या फेऱ्या वाढल्या होत्या. काहींच्या मते वानखेडेंच्या याच राजकीय महत्वकांक्षेनं त्यांना गोत्यात आणलं.

नवाब मलिक यांचे आरोप खरे ठरताय?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे एक ना एक दिवस तुरुंगात जातील असंही मलिकांनी सांगितलं होतं. मलिकांची ती वक्तव्ये आता तंतोतंत खरी होताना दिसतायत. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय आणि त्य़ांच्यावर अटकेची टांगती तलवारही आहे.