महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचणार? CM फडणवीसांनी सांगितली तारीख

Devendra Fadnavis : दावोसमध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचणार? CM फडणवीसांनी सांगितली तारीख
CM Fadnavis
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 21, 2026 | 10:25 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. हा दौरा राज्यासाठी खास आहे. या दौऱ्यात ते जगभरातील गुंतवणूकदारांशी चर्चा करून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवत आहेत. आतापत्यंत अनेक करार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील उद्योगांना चालना मिळणार असून रोजगार वाढणार आहे. तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. दावोसमध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. आपल्या या मुलाखतीत त्यांनी आतापर्यंत झालेले करार आणि महाराष्ट्रात होत असलेल्या गुंतवणुकीबद्दल सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत कधी पोहोचणार?

भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न आहे, यातील 1 ट्रिलियनचा वाटा महाराष्टाचा असावा असं राज्य सरकारचं स्वप्न आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दर दोन तीन वर्षांमध्ये आपल्याला विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांमुळे राज्याला फटका बसला आहे. मात्र सध्याचा ग्रोथ रेट पाहिला तर 2032 पर्यंत आपण 1 ट्रिलियनचा टप्पा गाठला पाहिजे. पण आमचा प्रयत्न 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा असणार आहे.

पीपीपी तत्वावर उभी राहणार स्मार्ट सिटी

पुढे बोलताना CM फडणवीस यांनी पेन-रायगड येथे भविष्यात होणाऱ्या स्मार्टसिटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 20 जानेवारी आपण एक सामंजस्य करार केला आहे. हा करार पेन-रायगड स्मार्टसिटीसंदर्भात आहे. पेन रायगड स्मार्टसिटी ही नवी मुंबईच्या विमानतळापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. ही पीपीपी पद्धतीने तयार होणारी पहिली स्मार्टसिटी आहे. यामध्ये खासगी लोक आणि एमएमआरडीए एकत्र आलेले आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

9 गुंतवणूकदार 1 लाख कोटींची गुंतवणूक

CM फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, या स्मार्टसिटीच्या सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत. या स्मार्टसिटीसाठी जवळपास 9 गुंतवणूकदारांनी 20 जानेवारी रोजी 1 लाख कोटी रुपये गुंतवण्याचा सामंजस्य करार केला आहे. हे गुंतवणूकदार सिंगापूर, यूएस, दुबई, यूएई नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया येथील असल्याचे सांगत पेन-रायगड स्मार्टसिटीच्या रुपात एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होत आहे. आपण नवी बिकेसी तयार करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.