Disha Salian : ‘मग आता का हा प्रश्न काढला?’, दिशा सालियान प्रकरणावर महायुतीमधल्या नेत्याचाच सवाल

Disha Salian : दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे.

Disha Salian :  मग आता का हा प्रश्न काढला?, दिशा सालियान प्रकरणावर महायुतीमधल्या नेत्याचाच सवाल
Disha Salian
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 20, 2025 | 11:33 AM

“दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध कुठेही नाही” असं आमदार रोहित पवार म्हणाले. “बिहारच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे हा मुद्दा आता भाजपकडून पुढे करण्यात येईल आणि बिहारची गेली निवडणूक ही सुशांत सिंगवर लढवली गेली होती. सामान्य नागरिकांना हे न्याय देऊ शकत नाहीत. सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणात अजून का न्याय मिळत नाहीय?. मी आज काळा शर्ट घातला आहे आणि मी या अधिवेशनाचा निषेध नोंदवत आहे. या अधिवेशनात मंत्री उत्तर देत नाहीत. बोलायला देत नाहीत” असं रोहित पवार म्हणाले.

“2020 साली मालाडमध्ये घडलेलं हे प्रकरण आहे. याची आता चर्चा होत आहे. इतक्या वर्षांनंतर ही याचिका दखल करण्याचे कारण काय?” असा सवाल महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला. “तिच्या वडिलांनी तेव्हाच याचिका दखल केली असती, तर न्याय मिळाला असता. मग आता का हे प्रश्न काढले?. औरंगजेब आणि दिशा सालियान हे महाराष्ट्राचे प्रश्न नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे. दिशा सालियान प्रकरणात जे कोणी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राची दिशाभूल नाही झाली पाहिजे” असं अमोल मिटकरी म्हणाले.

‘संजय राऊत काही बोलतात’

“दिशा सालियन ही पाच वर्ष आधीची केस आहे. यंत्रणांकडून रिपोर्ट आला आहे. यात राजकीय संबंध नाही असं म्हटलं आहे. पण तिच्या वडिलांना पुन्हा चौकशी व्हावी असं वाटलं असेल. संजय राऊत काही बोलतात, कोणताही मुद्दा सोडण्यासाठी नवा मुद्दा आणला नाही” असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

दिशा सालियनच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

दिशा सालियन कुटुंब राहत असलेल्या दादरमधील इमारतीत त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. दिशा सालियनचे आई-वडील दुसऱ्या मजल्यावर राहतात. प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारू नये, म्हणून त्यांनी पोलिस बोलावले असल्याची माहिती. सध्या सालियन कुटूंब राहत असलेल्या इमारती बाहेर शांततेच वातावरण आहे.