
“अरविंद तुम्ही केंद्रीय मंत्री होता आणि मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आपण काय-काय केलं आणि काय-काय होऊ दिलं नाही, त्या बद्दल सांगितलं, हाच मुद्दा आहे. ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की, दिल्लीला बसलेले दोन भाजपवाले फसवतायत. मी अरविंदला फोन केला. त्याला सांगितलं राजीनामा द्यावा लागेल. त्यावर अरविंदने कशासाठी? माझं काय चुकलं? असं न विचारता, येस सर बोलून राजीनामा देऊन आले” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज दादर येथे आयोजित भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
“एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडाळातून राजीनामा देतोय, पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना त्याला विचारावस वाटलं नाही की, का राजीनामा देतोय. इथे भाजपच्या मनातल्या काळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यांना अरविंद नको होता. कारण बिल पास करायला विरोध करणारा गेलेला बरा. अरविंदने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ना अरविंदला थांबवलं, ना मला फोन केला” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “मी मुख्यमंत्री झाल्यावर मी ते बिल अडवलं. मग मी असलेला कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे आहेत. मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा. म्हणून त्यांनी माझं सरकार पाडलं. तुमचं सरकार पाडलं. काळ कृत्य करून त्यांनी तुमच्या हक्काचं सरकार या कारणाने पाडलं” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे
“विभागात जे काही पदाधिकारी नेमाल, त्याने कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर ती पेटवू देणार नाही. त्याने शिवसेनेसोबतच राहिले पाहिजे. काही दिवसात जे लक्षात आलं. पूर्वी हॉटेल शहरी भागात होती. आता हॉटेल उपनगरात जातात. उपनगरातील आपले पदाधिकारी शिवसैनिक लागतातच. उद्योग धंदा किंवा नोकरी ही शाखेच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. आपली माणसं त्यात भरली पाहिजे. पदाधिकाऱ्यांना दंडक असला पाहिजे, अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय उघडा. पण आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे. काही कामगार कंपनीत कामगार सेनेत असतात, बाहेर मात्र इतर पक्षात असतात. हे चालणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही
“शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी ही शिवसेना आहे. मराठी माणसासाठी ही शिवसेना आहे. त्यात भेदाभेद होणार असेल तर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काही लागलं तरी शाखेसोबत तुमचा समन्वय असलाच पाहिजे. स्थानिक पातळीवर ज्यांना पद देता आलं नाही तर त्याला घेऊ नका. पण ज्याला कामगार कायदे कळतात त्या शिवसैनिकांना पदावर नेमा. हे स्वच्छ ठेवा” अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.