ती डीजेवर बेभान नाचली! पाहून पतीचं डोकंच फिरलं, नंतर रात्री ३ वाजता सासुरवाडीत जाऊन… नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी चुलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचली हे नवऱ्याला आवडले नाही. त्याने मध्यरात्री तीन वाजता सासूरवाडीमध्ये जाऊन जे केलं ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

ती डीजेवर बेभान नाचली! पाहून पतीचं डोकंच फिरलं, नंतर रात्री ३ वाजता सासुरवाडीत जाऊन... नेमकं काय घडलं?
नांदेड
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 13, 2026 | 12:25 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत काही ना काही घडत आहे. कोणी पतीचा छळ करत आहे तर कुठे पती पत्नीची हत्या करत आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. चुलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचल्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील टोकाचे पाऊल उचलले. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…

घटनेची पार्श्वभूमी

भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी असलेले विनोद रंगराव राठोड (४०) आणि त्यांची पत्नी पायल विनोद राठोड (२७) हे एका लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. १० मे रोजी लग्नादरम्यान पायल यांनी डीजेवर डान्स केला होता, जो विनोद यांना आवडला नाही. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर पायल आपल्या मुलांसह माहेरी (बोरगडी तांडा) निघून गेल्या होत्या. मात्र, विनोद यांच्या मनातील राग शांत झाला नव्हता. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास विनोद यांनी झोपेत असलेल्या पायल यांचा चाकूने गळा चिरून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यांनी गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

तीन मुले झाली पोरकी

या भीषण हत्याकांड आणि आत्महत्येमुळे राठोड कुटुंबातील दोन मुली आणि एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे छत्र हरपले आहे. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ही तीन निष्पाप मुले आता पोरकी झाली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस कारवाई

सकाळी पायल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शोध घेतला असता विनोद यांचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हिमायतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us