Mumbai Mayor Ritu Tawade : मुंबईला आठव्यांदा मिळणार महिला महापौर, याआधीच्या सात महिला महापौर कोण ?, याआधीच्या सात महिला महापौर कोण ? वाचा…

Ritu Tawade : मुंबईच्या महिला महापौर म्हणून पहिल्यांदा काँग्रेसच्या सुलोचना मोदी या निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता आठव्यांदा महिला महापौर म्हणून भाजपाच्या रितु तावडे यांची निवड होणार आहे.

Mumbai Mayor Ritu Tawade : मुंबईला आठव्यांदा मिळणार महिला महापौर, याआधीच्या सात महिला महापौर कोण ?, याआधीच्या सात महिला महापौर कोण ? वाचा...
Ritu Tawade Mumbai Mayor
| Updated on: Feb 07, 2026 | 10:05 PM

देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका, जवळपास ४८ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर अखेर भाजपाची सत्ता आली. त्यानंतर मुंबईचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज भाजपाने रितु तावडे यांचा महापौर पदाचा अर्ज भरला. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होते. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौर पदाची निवड होणार आहे.आता रितू तावडे याच भाजपच्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर असणार आहेत. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या महानगर पालिकेवर यापूर्वी देखील सात महिला महापौर झाल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहूयात….

मुंबई महापालिकेला आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे. यापूर्वी सात महिला महापौर झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची सत्ता आली तर मुंबई महानगर पालिकेचा महापौर खान असू शकतो अशी प्रचाराची सुरुवात भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली होती. त्यानंतर एका कार्यक्रमात मुंबईचा महापौर हा मराठी असणार का ? असा सवाल पत्रकाराने केला असता भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी शेवटपर्यंत मराठी हा शब्द न उच्चारता हिंदू होईल..हिंदू होईल असे पालपूद लावून ठेवले. त्यानंतर मुंबईचा महापौर हा हिंदू मराठी असेल इथपर्यंत प्रचाराची गाडी आली होती.

अखेर २५ वर्षांनी मुंबई महानगर पालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजपा महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याकडे लक्ष लागले होते. परंतू लॉटरीत हे पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले. उद्धव ठाकरे गटाने महापौर पदाच्या शयर्तीत उमेदवार उतरवण्याची पुडी सोडून दिली होती. परंतू आज महापौर पदाच्या उमेदवार म्हणून भाजपाचे नेते अमित साटम यांनी रितु तावडे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी ताई पेडणेकर यांनी भाजपाने मराठी महापौर दिल्याने आम्ही आता उमेदवार उतरवणार नाही असे सांगत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असे जाहीर केले.

काँग्रेसच्या सुलोचना मोदी पहिल्या महिला महापौर

१९५६ साली मुंबई महानगर पालिकेच्या ऐतिहासिक महापौर पदावर काँग्रेसच्या सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर निवडून आल्या होत्या. यानंतर १९९४ पर्यंत ३८ वर्षे एकही महिला महापौर झाली नाही. १९९४-९५ या कार्यकाळात मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदावर काँग्रेसच्याच निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महिला महापौर म्हणून विराजमान झाल्या. त्यानंतर १९९७-९८ च्या काळात शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा विशाखा राऊत यांना मिळाला.

 

त्यानंतर साल २००७-२००९ या कार्यकाळात डॉ. शुभा राऊळ यांना शिवसेनेकडून महापौर पदांची संधी देण्यात आली. तर २००९-१२ या काळात शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची धुरा आली. साल २०१४ ते २०१७ या काळात शिवसेनेच्या महिला महापौर म्हणून स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळला. साल २०१९ ते २२ च्या काळात शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेत महापौर पदी होत्या. तर आता साल २०२५ ला मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल आले आणि २५ वर्षांनंतर शिवसेनेकडून भाजपाकडे महापौर पद आले आणि पुन्हा हे पद महिला आरक्षित झाल्याने महापौर पदी भाजपाच्या रितू तावडे विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आतापर्यंत महिला महापौर

सुलोचना मोदी, काँग्रेस – १९५६

निर्मला सामंत प्रभावळकर, काँग्रेस – १९९४-९५

विशाखा राऊत, शिवसेना – १९९७-९८

डॉ. शुभा राऊळ,शिवसेना – २००७-२००९

श्रद्धा जाधव, शिवसेना – २००९-१२

स्नेहल आंबेकर, शिवसेना – २०१४ – २०१७

किशोरी पेडणेकर, शिवसेना -२०१९ – २२