उघड्या चेम्बरमध्ये पडून महिलेचा पाय फ्रॅक्चर, हातातलं 5 महिन्यांचं बाळही पडलं

पावसाळ्यात रस्त्यावरुन चालणंही मुंबई आणि परिसरात कठीण झालं आहे. रस्त्यावर चालत असताना उघड्या चेम्बरमध्ये पडल्याने महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना पालघरमध्ये घडली. दुर्देव म्हणजे यावेळी त्या महिलेच्या हातात तिचं पाच महिन्यांचं बाळही होतं.

  • मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 22:40 PM, 8 Jul 2019
उघड्या चेम्बरमध्ये पडून महिलेचा पाय फ्रॅक्चर, हातातलं 5 महिन्यांचं बाळही पडलं

पालघर : सध्या पावसाळ्यात रस्त्यावरुन चालणंही कठीण झालं आहे. रस्त्यावर चालत असताना उघड्या चेम्बरमध्ये पडल्याने एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना पालघरमध्ये घडली. पावसाळ्यात या उघड्या चेम्बरमध्ये पाणी साचलं होतं. त्यामुळे महिलेला त्या चेम्बरचा अंदाज आला नाही. दुर्देव म्हणजे यावेळी त्या महिलेच्या हातात तिचं 5 महिन्यांचं बाळही होतं. या घटनेत बाळाच्या डोक्यालाही इजा झाली. सध्या या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालघर नगर परिषदेच्या हद्दीत देविसहाय रस्ता येथील जायका हॉटेलजवळील इमारतीसमोर एक उघडं चेम्बर आहे. पावसाळ्यात या चेम्बरमध्ये पाणी साचलं होतं. प्रिती सिंग नावाची एक महिला याचं रस्त्यावरुन आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने जात होती. पावसामुळे सगळीकडेच पाणी साचलं होतं. त्यामुळे प्रिती सिंग यांना या उघड्या चेम्बरचा अंदाज आला नाही आणि त्या चेम्बरमध्ये पडल्या. चेम्बरमध्ये पडताना त्यांचं बाळ दूर फेकलं गेलं. त्यांना पडताना पाहून परिसरातील नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर प्रिती आणि त्यांच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेत प्रिती सिंग यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याने त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. मोठी इजा झाल्याने त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांच्या बाळाच्या डोक्यालाही इजा झाली असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, इतकी गंभीर घटना घडल्यावरही परिसरातील रहिवासी आणि नरगपरिषद एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ते उघडं चेम्बर परिसरातील एका इमारतीचं असल्याचा दावा नगरपरिषदेने केला. तर परिसरातील नागरिकांनी ते चेम्बर नगरपरिषदचं असल्याचं सांगितलं. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि नगरपरिषद दोघेही या प्रकरणातून हात झटकत आहेत. त्यामुळे या चेम्बरची नेमकी जबाबदारी कुणाची आणि कारवाई कुणावर करावी, असा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे.

नगरपरिषद हे चेम्बर त्यांचं नाही असं म्हणत असलं, तरी परिसरातील अशा धोकादायक चेम्बरवर योग्य ती उपाययोजना करणे हे नगरपरिषदेचं काम आहे. प्रशासनाला अनेकदा तक्रारी देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही नगरपरिषदेने याकडे कानाडोळा केल्याचंही नागरिकांनी सांगितलं.

ही घटना गंभीर असून या उघड्या चेम्बरमुळे माझ्या पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हे चेम्बर उघडं ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रिती यांच्या पतीने केली. तर नगरपरिषद प्रशासन अशा पद्धतीने चेम्बर उघडं ठेवत असेल, तर याची सखोल चौकशी करावी आणि फक्त चौकशीच नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

चिपळूणजवळ आणखी एका धरणाला गळती, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

पुढील पाच दिवस या भागात पावसाची शक्यता, पण मराठवाड्याकडे पाठ

निम्मा महाराष्ट्र कोरडाच, राज्यात दुष्काळाचं सावट कायम

गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा