या गावाने संकटाचंही सोनं केलं, भर दुष्काळातही शेकडो हातांना काम

पंढरपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना रोजी-रोटीसाठी स्थलांतर करावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 700 लोकसंख्या असलेलं गाव या परिस्थितीला अपवाद आहे. येळगी गावातील लोक स्थलांतर न करता दगड फोडून पोट भरतं. येथील गावकऱ्यांनी स्थलांतर न करता गावातील दगड फोडून पोट भरलेलं बरं असं म्हणत खडी क्रशरची उभारणी करून जगण्याचा नवा मार्ग शोधला. दगड …

या गावाने संकटाचंही सोनं केलं, भर दुष्काळातही शेकडो हातांना काम

पंढरपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना रोजी-रोटीसाठी स्थलांतर करावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 700 लोकसंख्या असलेलं गाव या परिस्थितीला अपवाद आहे. येळगी गावातील लोक स्थलांतर न करता दगड फोडून पोट भरतं. येथील गावकऱ्यांनी स्थलांतर न करता गावातील दगड फोडून पोट भरलेलं बरं असं म्हणत खडी क्रशरची उभारणी करून जगण्याचा नवा मार्ग शोधला. दगड फोडून पोट भरणारं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे. शिवाय या माध्यमातून गावाची आर्थिक घडी व्यवस्थित बसली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी येळगी हे 700 लोकवस्तीचं गाव. जमिनीत फूटभर खोदल्यानंतर दगडच दगड. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अशी शेतजमीन कसताना सर्वांच्याच नाकीनऊ येते. त्यामुळे कोरड्या शेतावर जगायचं तरी कसं असं म्हणत काही ग्रामस्थांनी दुसऱ्या गावाला स्थलांतर करीत आपले बस्तान बसविले. तर गावातील काही तरुणांनी एकत्रित येत 10 वर्षांपूर्वी एक खडी क्रशर सुरु केला.

गावात पाच ते सहा लहानमोठे खडी क्रशर सुरु उभारले आहेत. प्रत्येक क्रशरवर सात कुशल-अकुशल कामगार, ट्रॅक्टर, टिपर, जेसीबीच्या माध्यमातून सुमारे 20 जणांना रोजगार मिळाला आहे. गावातील जवळपास 100 हून अधिक कुटुंबातील सदस्यांना या माध्यमातून रोजगार मिळाल्याने काम मागणारे गावं आज काम देणारे ठरले आहे. हे सर्व करत असताना शासनालाही रॉयल्टीच्या माध्यमातून दरवर्षी लाखोंचा महसूल मिळू लागला आहे.

येथील शेतकऱ्यांनी दगड खाणींचा शेततळी म्हणून वापर केला आहे. खाणीत पाणी साठल्यामुळे या भागातील विहीरी आणि बोअरची पाणी पातळी देखील टिकून आहे. अन्य दुष्काळी गावात पाण्याचे टँकर सुरु असताना येथे मात्र पाण्याचा सुकाळ आहे. येथील शेतकऱ्यांनी खाणीतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत 80 एकर क्षेत्रावर डाळिंब, द्राक्षांसारख्या फळपिकांची लागवड केली. शिवाय चाऱ्याचाही प्रश्न सुटला आहे. दुष्काळी येळगीच्या तरुणांनी क्रशरच्या माध्यमातून आर्थिक प्रगती तर साधली आहेच. शिवाय या माध्यमातून पाण्याची मोठी बँकही तयार केली आहे. ऐन दुष्काळात येळगी गाव पाण्याने देखील समृद्ध झालं आहे.

पाऊस कमी पडल्यानंतर ओसाड रान पाहण्यापलीकडे शेतकऱ्यांकडे काहीही पर्याय नसतो. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम शेतकरी करतात. पण रोजगाराचे साधने अत्यंत मर्यादित असतात. पण दुष्काळात कसं रहायचं याचं उदाहरण येळगी गावाने घालून दिलं आहे. प्रत्येक गावच्या ग्रामस्थांनी आणि सरपंचाने हा आदर्श घेणं गरजेचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *