हातभट्टीत भीषण स्फोट, तरुणाचा मृत्यू; मग पुरावा मिटवण्यासाठी संपूर्ण खोलीच पेटवली, धक्कादायक प्रकार उघड
Uttan Gas Cylinder Blast: स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला. पण सत्य लपवण्यासाठी मृतदेह जाळल्याची घटना समोर आली आहे. उत्तन प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात बेकायदा हातभट्टीत झालेल्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हातभट्टीचा बेकायदा व्यवसाय उघड होण्याच्या भीतीने आरोपींनी मृत्यूचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा मिरा-भाईंदर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरातील सरकारी जागेवर कब्जा करून बेकायदा हातभट्टी चालवली जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या ठिकाणी आरोग्यास घातक दारू तयार करण्यासाठी सॅबस्टीन मेंडोसा, त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि रितू चौधरी (वय ३२) हे पाणी गरम करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की गॅस सिलिंडर आणि गरम पाण्याची टोप उडाली. या दुर्घटनेत रितू चौधरी यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर सॅबस्टीन आणि संदीप मेंडोसा हे दोघेही गरम पाण्यामुळे भाजून जखमी झाले.
मात्र हातभट्टीचा बेकायदा व्यवसाय उघड होऊ नये आणि पोलिसांच्या कारवाईपासून बचाव व्हावा, यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर घटनास्थळावरील खोलीला डिझेल ओतून आग लावण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृत तरुणाच्या पत्नीनेही खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपी सॅबस्टीन मेंडोसा याचा पाठलाग करून त्याला इगतपुरी येथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात तडीपार सराईत गुन्हेगार सॅबस्टीन मेंडोसा, त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपींची चौकशी सुरू आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होईल, असं सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.