भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे कोरडे पडायचे : अजित पवार

घोषणा देत असताना आमचेही घसे कोरडे पडायचे. मग कुणी गोळी दे, कुणी काय कर, असं व्हायचं, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

Ajit Pawar on BJP Agitation, भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे कोरडे पडायचे : अजित पवार

मुंबई : विरोधीपक्षात असताना अशी आंदोलनं करावी लागतात. भाजपला आंदोलन करताना पाहून आमचे दिवस आठवले, आमचेही घसे कोरडे पडायचे, अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाआधी अजित पवारांनी ‘टीव्ही9’शी संवाद साधला. (Ajit Pawar on BJP Agitation)

भाजपने आंदोलन करण्याचं काहीही कारण नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुरु झाली आहे. भाजपला पायरीवर बसून आंदोलन करत असताना बघून आम्हाला आमचे दिवस आठवले. घोषणा देत असताना आमचेही घसे कोरडे पडायचे. मग कुणी गोळी दे, कुणी काय कर, असं व्हायचं, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

भाजपने घाई करु नये. आता सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. आम्ही असं काम करु, की त्यांना आंदोलन करण्याची गरजच राहणार नाही, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मनमिळावू आहे, अशा शब्दात अजित पवारांनी कौतुकही केलं.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधीपक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह भाजप आमदारांनी पुन्हा पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली.

हेही वाचा – माळेगाव साखर कारखान्यावर झेंडा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

माळेगाव साखर कारखाना पाच वर्षांपूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आले आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळवण्यात यश आलं आहे. निवडणुकीत विजयश्री मिळवत अजित पवारांनी 2015 च्या पराभवाचा वचपा काढला. (Ajit Pawar on BJP Agitation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *