
देशभरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्ये कमाल तापमान 45 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळाचा परिणाम बिहार आणि झारखंडच्या काही भागातही दिसून आलाय. त्यामुळे तापमानात घट झाली असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ओडिशा, बंगाल, आंध्र प्रदेशचा काही भाग, ईशान्यकडील राज्य, बिहार, झारखंडमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे तापमानात घट झालीये. तापमान सामान्यपेक्षा खाली आले असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळाचा मात्र उत्तर भारतातील राज्यांवकर कोणताच परिणाम झालेला नाही. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात उष्णता कायम आहे. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार नाहीये. दिल्लीत ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. 31 मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हिंद महासागर आणि अरबी समुद्रातून हिमालयाकडे येणाऱ्या वाऱ्यांवर मान्सून अवलंबून असतो. जेव्हा हे वारे भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील पश्चिम घाटावर आदळतात तेव्हा भारत आणि आसपासच्या देशांमध्ये पाऊस पडतो. भारतातील मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आधी येतो. त्यानंतर देशात हळूहळू पावसाला सुरुवात होते. त्यानंतर उष्णतेपासून दिलासा मिळतो.
भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. राजस्थानमधील फलोदीमध्ये तर तापमान ५० अंशावर गेले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील किमान ३७ ठिकाणी रविवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले.
उष्णतेच्या लाटेचा प्रभाव ३० मेपर्यंत दिसून येईल. त्यानंतर मान्सून दाखल होणार असल्याने हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की सोमवारी दिवसभरात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. २७ मे रोजी पारा ४६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 30 मे पर्यंत उष्णतेचा कहर सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.