ओबीसी मराठा संघर्षावरील ग्रंथाचे प्रकाश, न्यायमूर्ती निरगुडे राहणार उपस्थित, मुंबईतील..
ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारी पर्व हा ग्रंथ सुनिल खोब्रागडे व प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीला असून या ग्रंथाचे प्रकाशन 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होत आहे.

मंडल आयोगप्रणित आरक्षण हे ओबीसींच्या विकासासाठी आहे. परंतू ओबीसी जातींचा विकास झाला तर आपल्या सत्तेला तडे जातील असा न्युनगंड मनात बाळगणार्या उच्च जाती सत्तेचा गैरवापर करून ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या जातीसंघर्षामुळे आज संविधान व लोकशाही धोक्यात आलेली आहे. या जाती-संघर्षाला जातीअंताकडे कसे नेता येईल याचे मार्गदर्शन करणारा ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारी पर्व’’ हा ग्रंथ सुनिल खोब्रागडे व प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीला असून या ग्रंथाचे प्रकाशन 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष माननीय आनंद निरगुडे यांची प्रमुख उपस्थिती या समारंभात आहे, अशी माहिती ओबीसी सेवा संघ, ओबीसी राजकीय आघाडी व माळी विकास मिशन यांनी संयुक्तपणे काढलेल्या पत्रकात दिली.
या ग्रंथाबद्दल अधिक माहीती देतांना पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मुंबईतील जरांगेंच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली येउन 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण करणारा जीआर काढला असून हा जीआर जात बदलण्याची परवानगी देतो. भारतात जोपर्यंत जातीव्यवस्था जीवंत आहे, तोपर्यंत कोणालाही जात बदलता येत नाही. हिंसक मार्गाने जातीव्यवस्था निर्माण करणारे धर्मशास्त्र व लोकशाही मार्गाने जातीव्यवस्था नष्ट करणारे संविधान हे दोघेही जात बदलण्याची परवानगी देत नाहीत.
जात नष्ट होऊ शकते परंतू जात बदलता येत नाही. आरक्षणासाठी जात बदलणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण सिद्धांत नष्ट करणे होय! हा जीआर केवळ ओबीसींचेच आरक्षण नष्ट करेल, असे नव्हे तर दलित-आदिवासींचेही आरक्षण नष्ट करणार आहे. त्यामुळे हा असंविधानिक जीआर त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी भुमिका या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथाच्या पहिल्या भागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातींना आरक्षण का नाकारले’ याचे ऐतिहासिक विश्लेशन केलेले आहे. ग्रंथाच्या दुसर्या भागात ‘कुणबी व मराठा या दोन भिन्न जातीतील संघर्षाचा इतिहास’ संदर्भ व पुरावे देऊन सिद्ध केलेला आहे.

तिसर्या भागात ‘जात बदलून देणारा जीआर संविधानविरोधी आहे, हे सिद्ध केलेले असून न्यायालयीन युक्तीवादासाठी ठोस मुद्दे दिलेले आहेत. ग्रंथ प्रकाशन समारंभात एड. प्रदिप ढोबळे, लता प्र.म., कल्याण दळे, राम वाडीभस्मे व एड. अरविंद निरगुडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच उपोषणकर्ते ओबीसी प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे, रविन्द्र टोंगे, भरत निचिते, रामभाऊ पेरकर, प्रा. विठ्ठल तळेकर, प्रल्हाद किर्तने व मंगेश ससाणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
