
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.
रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”
हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.
या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.
रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 2.25 लाख प्रवासी IRCTC च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे तत्काळ तिकीट बुक करतात. नुकत्याच झालेल्या 24 मे ते 2 जून दरम्यानच्या विश्लेषणानुसार, एका मिनिटात सरासरी 1,08,000 एसी क्लास तिकीट बुक झाली होती. दुसऱ्या मिनिटात 22,827 तिकीट बुक झाली होती. तर, पहिले 10 मिनिटांत एकूण 67,159 म्हणजेच 62.5 टक्के तत्काळ तिकीट विकले गेले होते. उर्वरित 37.5 टक्के तिकीट नंतरच्या कालावधीत विकले गेले, त्यात काही तिकीट चार्ट तयार होईपर्यंत तसेच 10 तासांनंतरही बुक करण्यात आली होती.
रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.