थेट मुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या आमदाराने दिला जबर धक्का, रामराम ठोकून…सत्ताधरी पक्षापुढे नवं संकट!
डॉ. चरणजित सिंह यांच्याआधी इतर तीन आमदारांनीही आप पक्षाची साथ सोडली. याआधी 2 नोव्हेंबर रोजी आप पक्षाच्या हरमीत सिंह पठानमाजरा, समानाचे आमदार चेतन सिंह जौड़ामाजरा आणि अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता.

Punjab Vidhan Sabha Election : देशात एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चर्चा सुरू आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. दुसरीकडे पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांतही राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. आगामी वर्षाला या राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे येथे नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. आपल्या सोईच्या पक्षात हे नेते उड्या मारतायत. दरम्यान, भाजपाचा कट्टर विरोध करणाऱ्या आप पक्षाला पंजाबमध्ये जबर धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमत्र्यांना पराभूत करणाऱ्या आमदाराने आप पक्षाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पार्टीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
पंजाब राज्यात आप पक्षाच्या अडचणी रोजच वाढत आहेत. येथे चमकौर साहीब या मतदारसंघाचे आमदार डॉ. चरणजित सिंह यांनी आप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. सोबतच ते शिरोमणी अकाली दल या पक्षात सामील झाले आहेत. चरणजित सिंह यांनी 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते चरणजीत सिंह चन्नी यांना पराभूत केले होते. आप पक्षाने पंजाबच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत चचरणजित सिंह यांना तिकीट दिलं नाही. सिंह यांच्याऐवजी चमकौर साहीब या जागेवर आप पक्षाने बसपाचे माजी प्रदेशाध्य जसवीर सिंह गढी यांना तिकीट दिले. यामुळे चरणजित सिंह यांनी आप पक्षाला रामराम ठोकत शिरोमणी अकाली दलमध्ये प्रवेश केला.
आतापर्यंत चार आमदारांनी सोडली साथ
डॉ. चरणजित सिंह यांच्याआधी इतर तीन आमदारांनीही आप पक्षाची साथ सोडली. याआधी 2 नोव्हेंबर रोजी आप पक्षाच्या हरमीत सिंह पठानमाजरा, समानाचे आमदार चेतन सिंह जौड़ामाजरा आणि अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. या तिन्ही आमदारांनी नवी दिल्लीमध्ये भाजपात प्रवेश केला. चरणजित सिंह हे एकमेव आमदार आहेत, ज्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केलाय. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आम आदमी पार्टीपुढे कोणते आव्हान उभे राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.