अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, एससी असूनही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; मोठी खळबळ
अभिजीत दीपके यांच्यासह पत्रकार रोजी, गजेंद्र सिंह आणि अन्य काही जणांवर दिल्लीत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. एसीपी विवेक भगत यांच्या तक्रारीनुसार, जंतरमंतर येथे जातीय टिप्पणी, सार्वजनिक अपमान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर प्रतिमा मलिन केल्याचाही ठपका आहे. खुद्द एससी असूनही दीपके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीचे एसीपी विवेक भगत यांच्या तक्रारीनंतर मुक्त पत्रकार रोजी, गजेंद्र सिंह आणि सीजेपीच्या काही सदस्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल 13 ऑक्टोबर रोजी संसद मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जातीसूचक वक्तव्य करणं, सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणं, सरकारी कामात व्यत्यय आणणं आणि सोशल मीडियावर कथितपणे प्रतिमा मलिन करण्याचा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अभिजीत दीपकेंवरही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
विवेक भगत यांच्या तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी ते जंतरमंतरवर निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या ड्युटीवर होते. यावेळी बुटा सिंग चौकात मुक्त पत्रकार रोजीने कथितपणे त्यांना जातीवरून (मेघवाल समाज) अपमानजनक विधान केलं. तसेच त्यांच्या पदावर नियुक्त राहण्यावरून सवाल केले. मात्र, मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझं काम करत राहिलो, असं भगत यांचं म्हणणं आहे.
लैंगिक छळाचा आरोप
दुपारी 3 वाजता आंदोलकांना सांभाळताना आणि ताब्यात घेताना रोजीने माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. रोजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला वारंवार त्रास दिला. त्यामुळे सरकारी कामात व्यत्यय आला. त्याच संध्याकाळी रोजी आणि अन्य लोकांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शने केली. माझ्याविरोधात घोषणाबाजी केली. यौन दरिंदा आणि संभावित बलात्कारी अशा घोषणाही माझ्या विरोधात देण्यात आल्या, असा आरोप भगत यांनी या तक्रारीत केला आहे.
या लोकांची नावे
रोजी, गजेंद्र सिंह आणि सीजेपीच्या काही सदस्यांनी माझ्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपाशी संबंधित पोस्ट आणि रील सोशल मीडियावर व्हायरल केली, असा आरोपही विवेक भगत यांनी केला आहे. भगत यांनी त्यांच्या तक्रारीत रोजी, गजेंद्र सिंह, अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दास आणि रत्ना सिंह यांची नावे नोंदवली आहेत. तक्रारीनुसार, संबंधित पोस्ट आणि रील एक्स तसेच इन्स्टाग्रामवरून व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मला मानसिक त्रास झाला असून माझी सामाजिक तसेच व्यावसायिक प्रतिमा मलिन झाली आहे, असा दावाही भगत यांनी केला आहे.
काय लावली कलमं
तक्रारीच्या आधारे एफआयआरमधील आरोपांच्या अनुषंगाने संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, यात एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत जातीसूचक टिप्पणी आणि अपमानासंबंधातील आरोप आहेत. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, कलम 356(2) आणि कलम 3(5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रोजीकडून करण्यात आलेली लैंगिक छळाची तक्रार दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे पाठवण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू आहे. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता चौकशीचा विषय आहे. एफआयआरमध्ये केवळ नाव आल्याने गुन्हा सिद्ध होत नाही, असं एसीपीने म्हटलं आहे.