
भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. सीमेवर युद्धासारखी स्थिती आहे. कुठल्याही क्षणी भारत मोठा हल्ला करेल ही पाकिस्तानला भिती सतावत आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाब दणाणणार हे निश्चित आहे. भारतीय सैन्याने आधीच स्वदेशी बनावटीच्या प्रलय टॅक्टिकल मिसाइलचे काही युनिट्स विकत घेतले आहेत. आता ही मिसाइल्स जास्त संख्येने विकत घेण्याची योजना आहे. भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचलेला असताना हा निर्णय घेण्यात येणार आहे. ‘प्रलय’ क्षेपणास्त्र एक दमदार शस्त्र आहे. युद्ध काळात आवश्यकता पडल्यास शत्रूची महत्त्वाची ठिकाणं उदहारणार्थ कमांड सेटर्स आणि शस्त्रास्त्र डेपोवर अचूक वार करण्याची प्रलय क्षेपणास्त्राची क्षमता आहे. भारतीय सैन्य आपली रणनितीक क्षमता अधिक सशक्त बनवण्यासाठी या क्षेपणास्त्राचे अतिरिक्त युनिट्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
‘प्रलय’ मिसाइल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलं आहे. हे एक क्वाज़ी-बॅलिस्टिक मिसाइल आहे. याची रेंज 150 ते 500 किलोमीटरपर्यंत आहे. 1000 किलोग्रॅमपर्यंत वॉरहेड वाहून नेण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. जमिनीच्या जवळून आडवं-तिडवं अपारंपरिक उड्डाण करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास, हे क्षेपणास्त्र उड्डाणवस्थेत आपला मार्ग बदलू शकतं. त्यामुळे शत्रूच्या रडारला या मिसाइलला पकडणं सोपं नाही. प्रलय मिसाइल प्रचंड स्पीडने आपल्या लक्ष्याचा वेध घेतं. प्रलय मिसाइलच्या विकासाला 2015 साली 332.88 कोटी रुपयांच्या बेजटसह मंजुरी दिली होती. प्रलयमध्ये पृथ्वी डिफेंस व्हीकल (PDV) आणि प्रहार मिसाइलच्या टेक्नोलॉजीचा समावेश करण्यात आलाय.
चीन आणि रशियाच्या तोडीच मिसाइल
प्रलय मिसाइल बनवण्यासाठी तीन मिसाइल्सच्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलाय. प्रहार, पृथ्वी-2 आणि पृथ्वी-3 ही ती तीन मिसाइल्स आहेत. प्रलयमध्ये रात्रीच्या अंधारातही हल्ला करण्याची टेक्नोलॉजी आहे. यात इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर आहे, ज्याच्या मदतीने रात्रीच्यावेळी अचूक लक्ष्यभेद करता येतो. या क्षेपणास्त्राची भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर तैनाती होईल. हे क्षेपणास्त्र चीनच्या डॉन्ग फेंग 12 आणि रशियाच्या इस्कंदर मिसाइलच्या तोडीच आहे.