
दिल्ली विधानसभेच्या निवडणूका येत्या ५ फेब्रुवारी रोजी आहेत. तर ८ फेब्रुवारीला निकाल आहेत. या निवडणूकांत भाजपाने केजरीवाल यांची सत्ता हटविण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावलेली आहे. मात्र केजरीवाल यांना सत्तेचा सोपन चढण्यासाठी उपयोगी ठरलेले आणि नंतर दुर्लक्षित झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी दिल्लीतील मतदारांना आवाहन करणारा व्हिडीओ जारी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या व्हिडीओने दिल्लीच्या निवडणूकांमध्ये रंजकता वाढली आहे.
अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचार विरोधी आमरण उपोषण करीत देशभरात प्रसिद्धी मिळविली होती. त्यानंतर या आंदोलनात माजी सनदी अधिकारी असलेले अरविंद केजरीवाल आणि टीम उतरली होती. या आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या मदतीमुळे भाजपाला जशी सत्ता मिळाली तशी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला सत्ता मिळाली. आंदोलनानंतर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी,योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्या टीमने आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. साल २०१३ मध्ये या पक्षाची दिल्लीत सत्ता आली. परंतू आपला चेला अरविंद केजरीवाल याने राजकारणात येऊ नये अशी गुरु अण्णा हजारे यांची इच्छा होती. परंतू केजरीवाल यांनी त्यांचे काहीही न ऐकता सत्ता मिळविली आणि भाजपाची डोकेदुखी वाढवली.
अण्णा हजारे यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात मतदारांनी स्वच्छ विचारांच्या आणि चरित्राच्या लोकांनाच मत देण्याचा आग्रह आपण करत आहोत. जे सत्याच्या मार्गावर चालले आहेत आणि त्याग करायला तयार असतील, अपमान सहन करायला तयार असतील त्यांनाच मते द्या. जर भारताला वाचवायचे असेल तर बलिदान द्यावे लागेल. मतदान प्रक्रीयेत मी पितोय आणि दुसऱ्यांना पिण्याची सुविधा होईल असा दृष्टीकोन नसायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिक्रीया आलेली नाही. केजरीवाल यांची देखील कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. याता या व्हिडीओतील आवाहनाचा दिल्ली वासियांवर काय परिणाम होतो हे पाहायला हवे.