
Asaduddin Owaisi: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी अल्जीरिया दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर आहे. त्यातील एका शिष्टमंडळात ओवैसी यांचाही समावेश आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वात हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ उत्तर अफ्रिकेतील अल्जीरियात दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाने पाकिस्तानची पोलखोल अल्जीरियात केली.
ओवैसी सर्वपक्षीय शिष्टमंडळात अल्जीरियात गेले आहे. त्यांनी अल्जीरियातून पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत शाहबाज सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणला. ओवैसी म्हणाले, इस्लामाबाद दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबत आला आहे. त्यामुळे दक्षिण आशियात अशांतता निर्माण झाली आहे. जकीउर रहमान लखवी नावाचा दहशतवादी पाकिस्तानात आहे. तो कारागृहात असताना बाप बनला आहे. जगभरात कुठेही दहशतवाद्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला कारागृहाच्या बाहेर जात येत नाही. परंतु लखवी कारागृहात असताना एका मुलाचा बाप बनला. त्यानंतर पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे लखवीवरील खटला पुढे सुरु झाला.
सांसद असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले, भारत आणि अल्जीरियाने नोव्हेंबर 2024 मध्ये एका करारावर सही केली होती. त्या करारानुसार दोन्ही देश पुढे जातील, अशी मला खात्री आहे. दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होतील. आमचे पंतप्रधान लवकरच अल्जीरियात येतील. तसेच अल्जीरियाचे राष्ट्रपतीही भारतात येतील, अशी मला अपेक्षा आहे. आमच्याकडे 2018 मधील अनुभव आहे. त्यावेळी अल्जीरियाने भारताला मदत केली होती.
सांसद ओवैसी यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धार्मिक मान्यता मिळाली आहे. परंतु इस्लाम कोणत्याही व्यक्तीला हत्या करण्याची परवानगी देत नाही. परंतु दुर्देवाने त्यांची विचारधारा वेगळी आहे. आता पाकिस्तानाला फायनेन्शियल एक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. त्यानंतर भारतातील दहशतवादी घटना कमी होतील. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर नियंत्रण करणे जागतिक शांततेसाठी आवश्यक आहे, असे ओवैसी यांनी म्हटले.